भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी

By बापू सोळुंके | Published: July 6, 2024 07:24 PM2024-07-06T19:24:14+5:302024-07-06T19:25:19+5:30

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजू शिंदे यांनी त्यांचे राजकीय भवितव्य विचारात घेऊन शुक्रवारी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला.

BJP's Raosaheb Danve, Atul Save on action mode after Raju Shinde's resign | भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी

भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेच्या वाटेवर असलेले अखेर माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी त्यांच्या भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिंदे यांनी फेसबुक या समाजमाध्यमावर  त्यांचा राजीनामा शेअर केला. असे असले तरी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ नये,यासाठी शनिवारी माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी सुरू केली. मात्र, शिंदे हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळते.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजू शिंदे यांनी त्यांचे राजकीय भवितव्य विचारात घेऊन शुक्रवारी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात त्यांच्या समर्थकांत चर्चा केली होती. ही बाब शुक्रवारी जगजाहिर होताच भाजपमध्ये खळबळ उडाली. शिंदे हे पूर्व मतदारसंघात राहात असले तरी त्यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हायचे आहे. महायुतीमध्ये हे सीट शिंदेसेनेकडे आहे. शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट हे या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीतही हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता नाही. ही बाब लक्षात घेऊन राजू शिंदे यांनी उद्धवसेनेकडून पश्चिम लढविण्यासाठी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे.  शिंदे यांच्या उद्धवसेनेत जात असल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली. पक्षाचे नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जावयाच्या बंगल्यात शनिवारी राजू शिंदे यांना बोलावून त्यांची मनधरणी केली. तर मंत्री अतुल सावे यांनीही शिंदे यांची भेट घेऊन पक्ष सोडण्यासंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी आग्रह धरला. 

सावे, शिरसाटांना धक्का
शिंदे यांनी भाजपला रामराम केल्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि पश्चिमचे आ.शिरसाट यांना धक्का बसला आहे. पूर्व मधील निवडणूक ही अटीतटीची होत असते. तसेच पश्चिममध्ये आता शिरसाट यांना त्यांच्याच जुन्या पक्षाकडून तगडा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. 

उद्धवसेनेतील इच्छुकामध्ये नाराजी
उद्धवसेनेमध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन कांबळे आणि लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा इच्छुक आहेत. तसेच माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. यामुळे शिंदे हे उद्धवसेनेत येत असल्याने इच्छुकामध्ये नाराजीचा सूर आहे.

Web Title: BJP's Raosaheb Danve, Atul Save on action mode after Raju Shinde's resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.