खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजप लोकप्रतिनिधींची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 04:10 PM2018-04-28T16:10:47+5:302018-04-28T16:11:54+5:30
शिवसेनेचे मंत्री असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे चित्र शुक्रवारी दिसले. शिवसेनेचे मंत्री असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हजर राहणे अपेक्षित असते. कृषी विभागाचे नियोजन समजून घेणे व आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे हीच अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते. मात्र, शुक्रवारी वाल्मी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीकडे भाजपचे स्थानिक आमदार, नेते कोणीच फिरकले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर व शिवसेनेचे अंबादास दानवे यांचीच उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील बैठकीत भाजप व शिवसेनेतील काही आमदारांची अनुपस्थिती सर्वांना खटकली. आ. अब्दुल सत्तार यांनी यावरील आपली खंत व्यक्त केली. पालकमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खाजगीत बोलताना खा. खैरे म्हणाले की, खुद्द विधानसभेचे अध्यक्ष आज शहरात आहेत. त्यांनी तरी बैठकीत यायला पाहिजे होते. पालकमंत्र्यांनी जरी दोन्ही पक्षांत सर्व आलबेल असल्याचे सांगितले असले तरीही बैठकीत आलेल्यांमध्ये दोन्ही पक्षांतील वाद एवढे टोकाला गेले, की पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीलाही भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी हजर राहिले नाहीत, अशीच चर्चा सुरू होती.
वैयक्तिक कारणाचा खुलासा
पत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारले असता, पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सारवासारवीचे उत्तर दिले. शिवसेना व भाजपचे संबंध चांगले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये काहीच वाद नाही. सर्व काही आलबेल आहे. भाजपचे आमदार व अन्य लोकप्रतिनिधी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, असा खुलासाही त्यांनी केला. शिवसेना-भाजपत चांगले संबंध असल्याने मी चांगल्या प्रकारे खरीप हंगाम बैठकीत बोलू शकलो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.