मराठवाड्यातील भागवत कराड यांच्या राज्यसभा उमेदवारीने भाजपचे सोशल इंजिनिअरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 01:38 PM2020-03-13T13:38:00+5:302020-03-13T13:45:06+5:30
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला प्राधान्य देत भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यात भाजपच्या कोट्यातून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळाला धक्काच बसला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला प्राधान्य देत भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला असून, तीन जागांपैकी अनुसूचित जाती, ओबीसी आणि मराठा समाजाला प्राधान्य देत समतोल साधला आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांपैकी भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले या दोघांची उमेदवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या जागेसाठी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कराड यांची उमेदवारी अंतिम झाली. उमेदवारी मिळविण्यासाठी पुण्याचे खा. संजय काकडे, खा. अमर साबळे, मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहीर आदी प्रयत्न करीत होते. या सर्वांना डावलून भाजपने डॉ. कराड यांचे नाव अंतिम केले आहे.
यातून ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्यातही परळी विधानसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर वंजारी समाजात भाजपविषयी नाराजीचा सुरू होता. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी ही नाराजी उघड केली. यात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे डॉ. कराड यांना उमेदवारी देण्यामागे फडणवीस यांचे पाठबळ असून, पंकजा मुंडे यांना त्यांच्या उमेदवारीविषयी कल्पना नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी डॉ. कराड यांचा बायोडाटा दिल्लीतून मागविण्यात आल्यानंतर गुरुवारी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी (विशेष वंजारी) समाजाला प्रतिनिधित्व देत पंकजा मुंडे यांना शह दिला असल्याचे बोलले जात आहे. या उमेदवारीमुळे एकाच दगडात अनेकांची शिकार केली असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसह भाजपतील पक्षांतर्गत विरोधकांना धक्का दिल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय डॉ. कराड यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आदींसोबत असलेल्या संबंधाचाही फायदा झाला आहे.
राष्ट्रवादीला थोपविण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसने वंजारी समाजातील धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना कॅबिनेट मंत्री बनविले. यातच पंकजा मुंडे पराभूत झाल्यामुळे मराठवाड्यातील वंजारी समाज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे जाऊ नये, म्हणून डॉ. कराड यांना उमेदवारी देत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आगामी काळात गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हेसुद्धा भाजपमध्ये अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना शह देण्याचा जोरदार प्रयत्न होऊ शकतो.
मराठवाड्यात शिवसेनेला रोखण्याची खेळी
भाजपने शिवसेनेला औरंगाबादेत हिंदुत्वाच्या मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत एमआयएमचा उमेदवार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:चा पराभव झाल्याचे बोलून दाखविले होते. या ठिकाणचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांना राज्यसभेची खासदारकी देत शिवसेनेला मजबूत केले जाईल, अशी शक्यता असतानाच भाजपने यात बाजी मारली. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने औरंगाबादला खासदार देत बाजी मारली असून, मराठवाड्यात शिवसेनेला रोखण्याची खेळी केली आहे.
मराठवाडा पदवीधरच्या उमेदवारीवर परिणाम
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर आणि राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्यात स्पर्धा होती. बोराळकर हे मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून तयारी करीत आहेत, तर घुगे यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करीत उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र, डॉ. कराड यांच्या उमेदवारीमुळे घुगे यांच्या उमेदवारीची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे बोराळकर यांचे एकमेव नाव उमेदवारीसाठी असणार आहे, तसेच ऐनवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांचेही नाव पुढे येऊ शकते, असे बोलले जात आहे.