लेबर कॉलनीच्या नागरिकांसाठी ‘शनि’वार ठरला काळा दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:13 PM2018-12-08T23:13:03+5:302018-12-08T23:14:14+5:30
विश्वासनगर लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर शासकीय निवासस्थाने उभारण्यात आली होती. या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत.
औरंगाबाद : विश्वासनगर लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर शासकीय निवासस्थाने उभारण्यात आली होती. या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. कधी राजकीय तर कधी न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. शनिवारी सकाळी अचानक शंभर पोलीस घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी लेबर कॉलनीत दाखल झाले. त्यांनी प्रत्येक घरात जाऊन सध्या कोण राहत आहे, यासंबंधीचे पुरावेच गोळा केले. आता आठ दिवसांमध्ये नोटिसा देऊन घरे रिकामी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
१९६० ते ६२ दरम्यान विश्वासनगर लेबर कॉलनी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाºयांसाठी ३३८ पेक्षा अधिक निवासस्थाने उभारण्यात आली. सुरुवातीच्या काळात अधिकारी व कर्मचारी निवृत्त होताच संबंधित विभागाला निवासस्थान रिक्त करून देत असत. मागील काही वर्षांमध्ये कर्मचारी निवृत्त झाले. अनेक जण मरणही पावले. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी ताबा सोडला नाही. अनेक जणांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. मागील दहा वर्षांपासून शासनस्तरावर लेबर कॉलनी रिकामी करून संपूर्ण १३ एकर जागेचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वेळी राजकीय हस्तक्षेप, कधी न्यायालयीन प्रक्रिया यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला ताबा घेण्यात यश आले नाही.
शनिवारी सकाळी ८ वाजता १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, २०० पेक्षा अधिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी लेबर कॉलनीत दाखल झाले. नागरिकांना हा ताफा कशासाठी आला आहे, हे कळण्यापूर्वीच कर्मचाºयांनी प्रत्येक घरांत जाऊन सर्वेक्षण सुरू केले. घरात सध्या कोण राहत आहे, त्यांचे आधार कार्ड, लाईट बिल कोणाच्या नावावर आहे, आदी कागदपत्रे गोळा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही प्रक्रिया पाहून घरांमध्ये राहणाºया शेकडो नागरिकांना थंडीतही घाम फुटला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आठ दिवसांमध्ये नोटीस देण्यात येईल. त्यानंतर घराचा ताबा द्यावा लागेल, असेही यावेळी नारिकांना सांगण्यात आले.
तीन तासांत सर्वेक्षण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक कर्मचाºयाला फक्त ७ घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. अवघ्या अडीच ते तीन तासांमध्ये कर्मचाºयांनी सर्वेक्षण पूर्ण केले. ज्या नागरिकांनी कागदपत्रे दिली नव्हती त्यांची कागदपत्रे नंतर सुभेदारी विश्रामगृह येथे स्वीकारण्यात येत होती.
प्रशासकीय इमारतीचा ‘प्लॅन’
विश्वासनगर-लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा ‘प्लॅन’ आखला आहे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून निवासस्थाने रिकामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.