काळाबाजार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:02 AM2021-08-12T04:02:12+5:302021-08-12T04:02:12+5:30
प्राथमिक अहवाल येताच निलंबन : जिकठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कागदपत्रांची पडताळणी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे घेतले जबाब औरंगाबाद - वाळूज ...
प्राथमिक अहवाल येताच निलंबन : जिकठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कागदपत्रांची पडताळणी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे घेतले जबाब
औरंगाबाद - वाळूज : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा काळाबाजार करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मात्र, प्राथमिक चौकशी अहवाल आल्यानंतर निलंबन होऊ शकते. त्यामुळे चौकशी समितीने मंगळवारी दुपारपासून जिकठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात ठाण मांडत सायंकाळी उशीरापर्यंत चौकशी केली. काही माहिती आरोपी आरोग्य कर्मचाऱ्याकडेच आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने आवश्यक माहिती घेतली जाणार आहे.
साजापुरात लसीचा काळाबाजार केल्याप्रकरणी आरोग्य सेवक गणेश दुरोळे आणि सय्यद अमजद या दोघांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोग्य विभागाने या प्रकाराची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. रेखा भंडारे, डाॅ. प्रशांत दाते या तिघांची चौकशी समिती नेमली. समितीने मंगळवारी दुपारी जिकठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन चौकशी केली. यावेळी केंद्रातील लस साठ्याची, वितरणाची पडताळणी करण्यात आली. त्याबरोबर अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले. आरोपी दुरोळेकडेच लस वितरणाची जबाबदारी होती. त्यामुळे लस वितरण करतानाच त्याने काही लस लंपास केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने कुठे कुठे लस वितरित केल्या, याची माहिती समितीला मिळणे बाकी आहे. आरोग्य केंद्रातील दररोजच्या लस साठ्याचे रेकार्ड व कागदपत्रांची तपासणी केली. आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले असून काहींचे जबाब बुधवारी घेण्यात येणार आहेत. सर्व कर्मचाऱ्याचे जबाव नोंदविल्यानंतर अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल, असे डॉ. रेखा भंडारी यांनी सांगितले.
निलंबनाचा प्रस्ताव तयार
संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव (फाईल) तयार करण्यात आला आहे. मात्र, निलंबनासाठी प्राथमिक चौकशी अहवाल आवश्यक आहे. त्यानुसार समितीने चौकशी सुरू केली आहे. हा अहवाल येताच निलंबन केले जाईल.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
कारवाई करणार
लसीच्या काळाबाजारप्रकरणी जिकठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी दिली.
------
फोटो ओळ- जिल्हा परिषद चौकशी समितीने जिकठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. रेखा भंडारी, डॉ. धानोरकर, डॉ. प्रशांत दाते आदींनी रेकार्ड व कागदपत्राची तपासणी करून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले.