रेमडेसिविरचा काळाबाजार; आरोपी अंगरक अनेक डॉक्टरांच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:42+5:302021-05-21T04:04:42+5:30

नितीन अविनाश जाधव (२८, रा. कोहिनूर कॉलनी) आणि औषधी कंपनीचा प्रतिनिधी गौतम देवीदास अंगरक (३६, रा. गादियाविहार) या आरोपींना ...

Black market of remedicivir; The accused bodyguard was in contact with several doctors | रेमडेसिविरचा काळाबाजार; आरोपी अंगरक अनेक डॉक्टरांच्या संपर्कात

रेमडेसिविरचा काळाबाजार; आरोपी अंगरक अनेक डॉक्टरांच्या संपर्कात

googlenewsNext

नितीन अविनाश जाधव (२८, रा. कोहिनूर कॉलनी) आणि औषधी कंपनीचा प्रतिनिधी गौतम देवीदास अंगरक (३६, रा. गादियाविहार) या आरोपींना गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक केली. या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक अनिल कंकाळ यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. परिचारिका आरती ढोले घाटीच्या कोविड वॉर्डात ३० मार्चपासून कंत्राटी परिचारिका म्हणून रुजू झाली. तिने इंजेक्शन दिल्याची कबुली जाधवने काल पोलिसांना दिली आहे. यामुळे आरतीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक गुरुवारी तिच्या घरी गेले. मात्र, तेथे ती सापडली नाही. तिने मोबाइल बंद केला आहे. ती कामावर आली नसल्याचे सूत्राने सांगितले.

===========

चौकट

आरोपी अंगरकचा जाधव एक पुरवठादार

आरोपी गौतम अंगरकची ३ महिन्यांपूर्वी एमआरची नोकरी गेली. एमआर म्हणून काम करताना त्याची औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर येथील अनेक डॉक्टरांशी ओळख आहे. त्याच्या मोबाइलमधील फोन लिस्टमधील १० जणांसोबत त्याचे कोविड रुग्णासाठी आवश्यक रेमडेसिविर आणि म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णाला लागणारी इंजेक्शन आणि औषधीसंदर्भात चॅटिंग झाल्याचे समोर आले. त्याला पुणे आणि अहमदनगर येथील व्यक्तीकडून या इंजेक्शनचा सर्वाधिक पुरवठा होत होता. त्याच्या अनेक पुरवठादारांपैकी जाधव हा एक असल्याचे सूत्राने सांगितले.

==================

केवळ पहिल्या नावाने नंबर सेव्ह

आरोपी अंगरक याने रेमडेसिविरशी संबंधित लोकांची नावे मोबाइलमध्ये केवळ पहिल्या नावाने ठेवली आहेत. यातील एक नाव तर फक्त ‘डॉक्टर’ एवढेच आहे. त्याच्या रॅकेटमध्ये मेडिकल स्टोअरचालक आणि डॉक्टर आहेत. यामुळे लवकरच या डॉक्टरपर्यंत पोलीस पोहोचू शकतात, असे सूत्राने सांगितले.

=====================

आरोपींना ५ दिवस कोठडी

आरोपी जाधव आणि अंगरकला तपास अधिकारी अनिल कंकाळ यांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांनी न्यायलयास सांगितले की, आरोपी जाधवच्या पत्नीला अटक करणे आहे. अंगरक आणि त्याने अन्य लोकांच्या माध्यमातून रेमडेसिविर आणि अन्य महागडी इंजेक्शन, औषधीचा काळाबाजार केला. त्यांच्या मोबाइलवरील चॅटिंगच्या आधारे त्यांची चौकशी करून या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने त्यांना ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना २४ मेपर्यंत कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली.

Web Title: Black market of remedicivir; The accused bodyguard was in contact with several doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.