रेमडेसिविरचा काळाबाजार; औरंगाबादेत टोळी गजाआड, पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:48 AM2021-04-28T05:48:01+5:302021-04-28T05:50:19+5:30
पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात; जास्त दराने विकत होते इंजेक्शन
औरंंगाबाद : जालना येथील कोविड केअर सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याची औरंगाबादेत चढ्या दराने विक्री करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनेश कान्हू नवगिरे (२८), साईनाथ अण्णा वाहूळ (३२), रवि रोहिदास डोंगरे तसेच संदीप सुखदेव रगडे (३२), प्रवीण शिवनाथ बोर्डे (२७), नरेंद्र मुरलीधर साबळे (३३) आणि अफरोज खान इकबाल खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. जमादार विशाल पाटील यांनी बनावट ग्राहक बनून टोळीचा मुख्य सूत्रधार दिनेश नवगिरे यास रेमडेसिविर इंजेक्शनसाठी फोन केला. इंजेक्शन देताना पथकाने दिनेशला पकडले.
चौकशीदरम्यान त्याने जालना येथील कोविड सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या सर्व साथीदारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५ रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अकोेल्यात दोघांना पोलीस कोठडी
बिहाडे हॉस्पिटल तथा कोविड सेंटर येथील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. सोनल फ्रान्सिस मुजमुले व भाग्येश प्रभाकर राऊत अशी आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी न्यायालयाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राम नगरातील एका मेडिकल स्टोअर्समधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी आशिष समाधान मते याला ताब्यात घेतले होते. त्याच्या माहितीवरून त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली. या पाच आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सोनल व भाग्येश या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली.