कोरोना निर्बंधात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; वाढीव दराने तात्काळ तिकिटे विकणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 06:23 PM2021-04-24T18:23:11+5:302021-04-24T18:34:34+5:30
Black marketing of tatkal train tickets :छगन खैरू राठोड (४१, रा. पदमपुरा) आणि कल्पेश सखाराम माळी (३७, रा. शिर्डी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
औरंगाबाद : कोरोना निर्बंधांमुळे मुंबई, मनमाड, नाशिक येथून गावी परतणाऱ्या परप्रांतियांना अव्वाच्या सव्वा दरात तात्काळ तिकिट विकणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाने शनिवारी जेरबंद केले. कोरोना काळाचा गैरफायदा घेत रेल्वेच्या तिकिटांच्या माध्यमातून लूट करण्याचा उद्योग सुरू असल्याचे समोर आले आहे.
छगन खैरू राठोड (४१, रा. पदमपुरा) आणि कल्पेश सखाराम माळी (३७, रा. शिर्डी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. यात छगन राठोड हा रेल्वेने संगणकीय यंत्रणेच्या कामासाठी नेमलेल्या सीएमएस या कंपनीचा कर्मचारी आहे. रेल्वेच्या औरंगाबाद विभागातील पॅसेंजर रिझर्व्हरेशन सिस्टिमला (पीआरएस)इंटरनेट पुरविण्याचे काम करतो. कल्पेश हा मुंबई, नाशिक, मनमाड येथील प्रवाशांना तिकिट विकण्याचे काम करतो. रेल्वे सुरक्षा बल विभागाला या दोघांविषयी दोन दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. सलग दोन दिवस प्रयत्न करूनही ते जाळ्यात अडकत नव्हते. सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ९.३० वाजता कन्नड येथील पोस्ट आफिसमधील पॅसेंजर रिझर्व्हरेशन सिस्टिमवरून त्यांनी ११ हजार ६६० रुपयांची चार तात्काळ तिकिटे काढली. १२ प्रवाशांचा समावेश असलेल्या या तिकिटांत दोन एसी आणि दोन स्लिपर तिकिटांचा समावेश होता. एसीसाठी प्रतिप्रवासी एक हजार आणि स्लीपरसाठी प्रति प्रवासी ५०० रुपये अतिरिक्त आकारून ते तिकिट विकत होते. या दोघांविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त मिथून स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, उपनिरीक्षक चंदूलाल के. , सहायक निरीक्षक विजय वाघ, काॅन्स्टेबल यू. आर. ढोबाल, हनुमान मिना, सुरज बाली यांनी ही कारवाई केली.
मोठे मासे अडकण्याची शक्यता
छगन राठोड याच्यावर यापूर्वीही अशी कारवाई झालेली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली. औरंगाबादेत अशाप्रकारे तात्काळ तिकिटांचा काळाबाजार करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन तात्काळ तिकिटे काढून विकण्याचा प्रकार सुरु आहे. या प्रकरणात मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.