अपघातासाठी प्रसिद्ध ‘ब्लॅक स्पॉट’चे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:32 AM2017-10-31T00:32:05+5:302017-10-31T00:32:12+5:30

औरंगाबाद-अहमदनगर व मुंबई-नागपूर महामार्गावर अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’चे आज सोमवारी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

 The 'Black Spot' survey, famous for the accident | अपघातासाठी प्रसिद्ध ‘ब्लॅक स्पॉट’चे सर्वेक्षण

अपघातासाठी प्रसिद्ध ‘ब्लॅक स्पॉट’चे सर्वेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : औरंगाबाद-अहमदनगर व मुंबई-नागपूर महामार्गावर अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’चे आज सोमवारी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात आरटीओ, जागतिक बँक प्रकल्प व वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी पुढाकार घेऊन या अपघात स्थळांची पाहणी केली. या धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट’ची यादी तयार करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
वाहतूक शाखेच्या वाळूज विभागांतर्गत मुंबई-नागपूर व औरंगाबाद-नगर या दोन महामार्गाचा समावेश आहे. या दोन्ही महामार्गांवर दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरूअसते. या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनधारकांना या महामार्गावरून कसरत करीत ये-जा करावी लागते. याशिवाय महामार्गावर रस्त्याच्या कडेला अनेक वाहनधारक वाहने उभी करीत असल्यामुळे रस्ता अरुंद बनला असून, वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो.
या महामार्गावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण, पार्किंगचा अभाव, दुभाजकांची दुरवस्था, धोकादायक पद्धतीने उभारलेले गतिरोधक आदींमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या दोन्ही महामार्गांवर अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या या ‘ब्लॅक स्पॉट’वर सतत प्राणांतिक, गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या मार्गावर झालेल्या अनेक भीषण अपघातात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे यांना आदेश बजावून उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, आरटीओ यांना सोबत घेऊन या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्याचे आदेश बजावले होते.
पथकाकडून सर्वेक्षण
आज सोमवारी वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चव्हाण, जागतिक बँक प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता कानडे,आरटीओचे यादव, काळे, वाहतूक शाखेचे पोकॉ. रामेश्वर कवडे, शेख हबीब, शमशू सिद्दीकी, कुंटेवार, खरात, मादगरकर, स्वामी आदींच्या पथकाने औरंगाबाद-नगर व मुंबई- नागपूर महामार्गावरील अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.

Web Title:  The 'Black Spot' survey, famous for the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.