‘सीसीटीव्ही’वर काळ्या पट्ट्या एटीएम फोडून १२ लाख लुटले
By Admin | Published: October 9, 2016 12:53 AM2016-10-09T00:53:15+5:302016-10-09T01:09:51+5:30
बिडकीन, औरंगाबाद : ‘आयसीआयसीआय’ बँकेचे ‘एटीएम’ गॅस कटरने कापून ११ लाख ९२ हजार २०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची
बिडकीन, औरंगाबाद : ‘आयसीआयसीआय’ बँकेचे ‘एटीएम’ गॅस कटरने कापून ११ लाख ९२ हजार २०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री बिडकीनजवळील निलजगाव फाटा येथे घडली.
‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे बिडकीन परिसरातील शेतकरी मालामाल झाल्याने अनेक बँकांनी या परिसरात आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. निलजगाव फाटा येथे ‘आयसीआयसीआय’ बँक असून, ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेसमोरच ‘एटीएम’ बसविण्यात आले आहे. ‘एटीएम’च्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र, सायंकाळी ६ ते १० या वेळेत सुरक्षारक्षकाला सुटी असते. नेमकी हीच बाब हेरून चोरट्यांनी ‘एटीएम’वर डल्ला मारला.
आठ वाजताच भरले पैसे
‘आयसीआयसीआय’ बँकेने ‘एटीएम’चे परिचालन करण्याची जबाबदारी सेक्युअर व्हॅल्यू कंपनीवर सोपविली आहे. ‘सेक्युअर व्हॅल्यू’च्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री ८ वाजता ५०० रुपयांच्या २००० आणि १०० रुपयांच्या १०००, असा ११ लाख रुपयांचा भरणा केला. ‘एटीएम’मध्ये पूर्वीचे ९२,२०० रुपये शिल्लक होते. भरणा करून कर्मचारी निघून गेले, तर सुरक्षारक्षक रात्री १० वाजता येणार होता. हीच संधी चोरट्यांनी साधली.
११ लाख ९२,२०० रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ‘एटीएम’चा सुरक्षारक्षक ड्यूटीवर आला. ‘सीसीटीव्ही’ला काळ्या पट्ट्या चिकटविल्याचे तसेच ‘एटीएम’ फोडल्याचे बघून त्याची पाचावर धारण बसली. सुरक्षारक्षकाने तातडीने ‘व्हॅल्यू सिक्युअर’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली.
४पैठणचे पोलीस उपअधीक्षक बच्चनसिंग, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, फौजदार विठ्ठल आईटवार, भगतसिंग दुल्लत, दीपक देशमुख, सुग्रीव घुगे, अनंत घोळवे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी वायरलेसवर संपर्क साधून सर्व ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या तसेच ‘सर्च आॅपरेशन’ राबविले; परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी ‘व्हॅल्यू सिक्युअर’चे अधिकारी राजेंद्र काकडे यांच्या तक्रारीवरून बिडकीन ठाण्यात अज्ञात चोेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेहरे झाकून घेतलेल्या अज्ञात चोरट्यांनी रात्री ९ ते १० यावेळेत ‘एटीएम’मध्ये प्रवेश केला. ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यावर त्यांनी काळ्या पट्ट्या चिकटविल्या. त्यानंतर गॅस कटरने ‘एटीएम’ कापून ११ लाख ९२,२०० रुपयांची रोकड लांबविली.
४गॅस कटरने ‘एटीएम’ कापले जात असताना त्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्या एकालाही शंका आली नाही, हे विशेष.