ब्लॅकमेल करून विवाहितेवर सतत अत्याचार करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:22 PM2018-11-03T23:22:24+5:302018-11-03T23:22:51+5:30
बहिणीच्या मैत्रिणीवरील अत्याचाराचे मोबाईलवर छायाचित्र काढून त्याआधारे तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत बलात्कार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : बहिणीच्या मैत्रिणीवरील अत्याचाराचे मोबाईलवर छायाचित्र काढून त्याआधारे तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत बलात्कार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. पीडिता नवरा व आई-वडिलांपासून विभक्त राहत असल्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. ही घटना ७ एप्रिल ते १३ जूनदरम्यान हुसेन कॉलनी, विजयनगर आणि कांचनवाडी येथे घडली.
जोनाथन विल्सन दाभाडे (रा. हुसेन कॉलनी), असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, आरोपीची बहीण आणि २१ वर्षीय पीडिता ही अनाथाश्रमात राहत होत्या. नंतर ती अहमदनगर येथे पतीकडे गेली. मात्र, पतीसोबत भांडण झाल्याने ७ एप्रिल रोजी ती मैत्रिणीच्या हुसेन कॉलनी येथील घरी आश्रयास आली. तेथे राहत असताना मैत्रिणीच्या भावाने तिच्या असाहयतेचा गैरफायदा घेत प्रथम तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराचे त्याने मोबाईलवर छायाचित्र काढले. ते छायाचित्र तुझ्या आई-वडिलांना आणि पतीला दाखवीन, अशी धमकी देत तो तिच्यावर हुसेन कॉलनीतील त्याच्या घरात, कांचनवाडी आणि विजयनगर येथे नेऊन सतत बलात्कार करीत होता. ७ एप्रिल ते १३ जून या कालावधीत आरोपीने या प्रकारे अत्याचार केला. त्यानंतर ती आरोपीचे घर सोडून गेली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री तिने पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक एल.ए. सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र पवार आणि कर्मचाºयांनी आरोपीला अटक केली.
चौकट
प्रेमविवाह केल्यामुळे गेली अनाथाश्रमात
अल्पवयीन असताना पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे पीडितेच्या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. नंतर आई-वडिलांनी तिचा स्वीकार न केल्याने तिला औरंगाबादेतील शासकीय महिलागृहात ठेवण्यात आले होते. तेथे आरोपीची बहीणही राहत होती. वयाची अठरा वर्षे झाल्यानंतर आरोपीची बहीण आणि पीडिता तेथून बाहेर पडल्या. आरोपीची बहीण स्वत:च्या हुसेन कॉलनीतील घरी राहण्यास आली, तर पीडिता पतीकडे गेली. मात्र, त्यांच्यात भांडण झाल्यानंतर ती मैत्रिणीकडे आली. घरात राहत असलेल्या असाहाय विवाहतेचा गैरफायदा आरोपीने घेतला.