मैत्रिणीचे लग्न होताच मित्र करू लागला ब्लॅकमेल; ६ लाखांसाठी पतीला पाठविले चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:21 PM2022-05-19T12:21:41+5:302022-05-19T12:22:21+5:30
ती आणि पवन राजस्थानमध्ये एकाच कंपनीत नोकरी करीत होते.
औरंगाबाद : सहा लाखांच्या खंडणीसाठी राजस्थानमधील एका जणाने औरंगाबादच्या मैत्रिणीला ब्लॅकमेल करीत तिच्या पतीला बनावट अश्लील छायाचित्रे आणि व्हॉट्सॲप कॉलिंग, चॅटिंगचा स्क्रीनशॉट पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराने व्यथित झालेल्या महिलेने सातारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली.
पवन जायस्वाल (रा. रासमंद, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार ३० वर्षीय विवाहितेचे माहेर राजस्थान आहे. ती आणि पवन राजस्थानमध्ये एकाच कंपनीत नोकरी करीत होते. तेव्हा आरोपीसोबत तिची मैत्री झाली होती. यादरम्यान त्यांचे मोबाइलवर चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलही होत असत. शिवाय त्यांनी एकत्र छायाचित्रेही काढली होती. आरोपीने या व्हिडीओ कॉल्सचे रेकॉर्डिंग केले तसेच चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढले होते.
दरम्यान, तिचे लग्न झाले आणि ती पतीसह औरंगाबादेतील सातारा परिसरात राहायला आली. ही बाब पवनला खटकली. त्याने तिच्याकडे ६ लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. तिने नकार दिल्यानंतर तो त्यांच्या दोघांनी एकत्र काढलेली छायाचित्रे, अश्लील व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग तुझ्या नवऱ्यास पाठवतो, अशी धमकी देत ब्लॅकमेल करू लागला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. मात्र त्याने त्यांच्यातील व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट, तिच्या मोबाइलवर आणि तिच्या पतीच्या फेसबुक मेसेंजरवर पाठविला. एवढेच नव्हे तर त्याने तिच्या नावाची फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केली आणि त्यावर पीडितेचा मोबाइल क्रमांक व्हायरल केला. हा प्रकार पीडिता आणि तिच्या पतीला समजताच त्यांनी मंगळवारी सातारा पोलीस ठाण्यात पवनविरोधात फिर्याद दिली.