छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग?

By विकास राऊत | Published: May 8, 2023 01:31 PM2023-05-08T13:31:51+5:302023-05-08T13:32:11+5:30

काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत.

Blackmailing entrepreneurs by political leaders in Chhatrapati Sambhajinagar; How will new industries come? | छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग?

छत्रपती संभाजीनगरात स्वयंघोषित नेत्यांकडून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग; कसे येणार नवे उद्योग?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) ठरावीक राजकीय पक्ष नेते, स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून उद्योजकांना ब्लॅकमेल केले जात आहे. वेठीस धरण्याच्या या प्रकारावर जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत गांभीर्याने चिंतन करण्यात आले. अशी परिस्थिती असेल तर डीएमआयसी- ऑरिक मोठे उद्योग गुंतवणूक कशी करतील, असा प्रश्न आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग समिती मित्र समितीच्या बैठकीत मसिआ या संघटनेने याबाबत प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले आहे.

संघटनेने चर्चेसाठी उद्योजकांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडताना खोट्या तक्रारींमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये राजकीय पक्षांकडून होत असलेल्या खोट्या तक्रारींवरून होणाऱ्या त्रासासह अनेक मुद्यांना हात घातला. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सदरील प्रकरण गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांच्या कानावर घातले. काही संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते, स्वयंघोषित नेते, सामाजिक कार्यकर्ते, वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्याेगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विरोधात एमआयडीसीकडे बिनबुडाच्या तक्ररी करीत आहेत. उद्योजकांनी बेकायदा अतिक्रमण केल्याच्या खोट्या तक्रारी करून कारवाई करण्यासाठी, उद्योग बंद करण्यासाठी निवेदन दिले जात आहे. एमआयडीसीने कारवाई न केल्यास कारखान्यासमोर अथवा एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाची धमकी दिली जाते. सर्वसाधारणपणे विचार केला तर उद्योग नियमाप्रमाणे बांधकाम करतात. त्यासाठी नियमित परवानगी घेतली जाते; परंतु, सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते बळजबरीने हप्ता वसुलीच्या उद्देशाने एमआयडीसीकडे उद्योगांच्या विराेधात तक्रारी करून यंत्रणेला वेठीस धरीत आहेत. एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत कळविले आहे, असे उद्योजकांनी समितीच्या बैठकीत नमूद केले.

...तर औद्योगिक वातावरणाला धक्का बसेल
काही ठरावीक राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते एकाच प्रकारची तक्रार वेगवेगळ्या उद्योगांच्या विरोधात करतात. या तक्रारींच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास व धमक्या देऊन रक्कम उकळण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे उद्योजकांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागते. अशा प्रकारामुळे औद्याेगिक वातावरणाला धक्का बसू शकतो.

इतर अनेक मुद्यांवर चर्चा....
सोलापूर- धुळे मार्गाला एमआयडीसीचे रस्ते जोडणे, वाळूज ओॲसिस चौकात उड्डाणपूल बांधणे, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीत वीजवितरणचे स्वतंत्र केंद्र स्थापन करणे, औद्योगिक वसाहतींमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणे, चिकलठाण्यासह सर्व उद्योग वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यासह इतर मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

गुंतवणुकीवर परिणाम होईल...
उद्योग क्षेत्रामध्ये ब्लॅकमेलिंगचे प्रकार खोट्या तक्रारींच्या आडून सुरू आहेत. फायर सुरक्षा यंत्रणा आहे काय, बीसीसी आहे की नाही. अशा तक्रारी एमआयडीसीकडे केल्या जातात. तक्रारकर्ते राहतात शहरात आणि तक्रारी उद्योगांच्या करतात. यामागे हेतू सर्वश्रुत आहे. याचा इको सिस्टीम व नवीन गुंतवणुकीवर परिणाम होईल. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला आहे.
- किरण जगताप, अध्यक्ष मसिआ

Web Title: Blackmailing entrepreneurs by political leaders in Chhatrapati Sambhajinagar; How will new industries come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.