अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; सायबर गुन्हेगार वापरत आहेत नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:00 PM2020-08-19T15:00:40+5:302020-08-19T15:04:38+5:30

समाजमाध्यमावर सक्रिय मोबाईल क्रमांक मिळवून सायबर गुन्हेगार करत आहेत फसवणूक

Blackmailing by pornographic video calls; Cybercriminals are using new tricks | अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; सायबर गुन्हेगार वापरत आहेत नवा फंडा

अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंग; सायबर गुन्हेगार वापरत आहेत नवा फंडा

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेतसमाजमाध्यमावर अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करू नये. 

औरंगाबाद : सोशल मीडियावरील नंबर मिळवून व्हिडिओ कॉल करीत अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगचा नवीन फंडा सायबर गुन्हेगार वापरत असल्याचे समोर आले. यासंदर्भात शहरातील नामांकित डॉक्टर आणि व्यापाऱ्याच्या तक्रारी सायबर पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.

आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. या मोबाईलधारकांचे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्यूटर अशा समाजमाध्यमांवर अकाऊंट असते.  समाजमाध्यमावर सक्रिय मोबाईल क्रमांक मिळवून सायबर गुन्हेगार विशेषत: पुरुषांना महिला, मुली  चॅटिंग बॉक्समधून संपर्क साधतात. नंतर व्हिडिओ कॉल करतात. व्हिडिओ कॉल स्वीकारताच कॉल करणारी तरुणी, महिला तिच्या अंगावरील कपडे काढत असल्याचे दिसते. अवघ्या १० ते १५ सेकंदात हा कॉल बंद होतो. तेथून पुढे सायबर गुन्हेगाराकडून ब्लॅकमेलिंग सुरू होते. त्या व्हिडिओतील मुलीसोबत तुमच्या चेहऱ्याच्या व्यक्ती नग्नावस्थेत असल्याची क्लीप तयार करून ती अश्लील क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी सुरू होते. 

सुरुवातीला दोन हजार, तीन हजारांची मागणी केली जाते. ही रक्कम दिली तर व्हिडिओ क्लीप नष्ट करू, असेही सांगितले जाते. या लोकांच्या सापळ्यात अडकलेला व्यक्ती इभ्रतीला घाबरून गुन्हेगारांना पेटीएमद्वारे पैसे पाठवितो. मात्र, यानंतरही पैशाची मागणी थांबत नाही. यू ट्यूबवर व्हिडिओ अपलोड करीत असल्याचे दाखवून पैसे पाठवले नाही  तर अवघ्या काही सेकंदात क्लीप अपलोड होईल असे बजावतात. अशा प्रसंगाला प्रथमच सामोरे जाणारा माणूस घाबरून  त्यांना पुन्हा पैसे पाठवितो. नंतर पुन्हा पुन्हा यू ट्यूबची लिंक पाठवून पैशाची मागणी होते.  रक्कम पाठविली तर क्लीप यू ट्यूबवरून हटविली जाईल अन्यथा अन्य माध्यमावर प्रसारित केली जाईल असे सांगून ब्लॅकमेल केले जाते. अशा प्रकारे शहरातील एक नामांकित डॉक्टर आणि व्यावसायिकाला ऑनलाईन ब्लॅकमेल करून सायबर गुन्हेगारांनी आर्थिक शोषण केल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.

सायबर गुन्हेगारांचा उद्देश केवळ पैसे उकळणे 
सायबर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण म्हणाले की, सायबर गुन्हेगारांचा उद्देश पैसे उकळणे हाच असतो. ते वेगवेगळ्या धमक्या देऊन ब्लॅकमेल करतात. यामुळे समाजमाध्यमावर अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करू नये. 

Web Title: Blackmailing by pornographic video calls; Cybercriminals are using new tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.