गुप्तधनासाठी नरबळीचा डाव उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:14 AM2018-08-25T05:14:39+5:302018-08-25T05:16:47+5:30
गुप्तधन काढण्यासाठी १ लाख ६८ हजार घेऊन मुलीचा बळी देण्याचा डाव ‘अंनिस’ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला.
वडोदबाजार (जि. औरंगाबाद) : गुप्तधन काढण्यासाठी १ लाख ६८ हजार घेऊन मुलीचा बळी देण्याचा डाव ‘अंनिस’ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव शिवारातील शेतवस्तीवर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडून पुजेचे साहित्य, हंडा व मूर्ती जप्त केली.
रांजणगाव येथील दिंगबर कडूबा जाधव यांचे गावात पडके घर असून या घरात दडलेले गुप्तधन काढण्यासाठी बाळू गणपत शिंदे व इमामखा हसन पठाण (रा. दोघे जालना) या स्वयंघोषीत मांत्रिकांनी त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार रुपये घेतले होते. मागील पंधरा दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे नियोजन केले जात होते. यासाठी जाधव यांनी त्यांना अगोदरच धान्य, दाळ, दाणे दिले होते. तसेच इतर पुजेचे सामान आणण्यासाठी आणखी पैसेही दिले होते. त्यानुसार जाधव यांच्या शेतात एक खड्डा खोदण्यात आला. त्यामधून दोन दिवसांपूर्वी शिंदे व पठाण यांनी चलाखीने दीड किलो वजनाची सोन्याची भासवून पितळी मूर्ती व एक तांब्याचा हंडा काढून दाखवला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. परंतु हंडा कापडाने बांधून तो सोन्याने भरल्याचे सांगून दुसरा हंडा काढेपर्यंत त्याचे तोंड उघडायचे नाही, अशी ताकीद देण्यात आली होती.
शुक्रवारी रात्री दुसरा हंडा ते काढून देणार होते. त्यासाठी एका मुलीची नग्न अवस्थेत पूजा करुन तिचा बळी त्याठिकाणी दिला जाणार होता. तशी तयारी करण्यात येत असल्याची माहिती अंनिसचे शहाजी भोसले यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता औरंगाबाद येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख पंडित बोरसे यांना घेऊन फुलंब्री पोलीस ठाणे गाठले व घटनेची माहिती दिल्यांनतर भंडाफोड झाला.
रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.