नेत्रहीन वृत्तपत्र विक्रेते शेख नाहीद यांच्या जिद्दीचे ‘लोकमत’मध्ये कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 02:28 AM2019-12-04T02:28:47+5:302019-12-04T02:29:00+5:30
आज त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो.
औरंगाबाद : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त औरंगाबादेतील नेत्रहीन वृत्तपत्र विक्रेते व एजंट शेख नाहीद यांचा लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी लोकमत कार्यालयात मंगळवारी सत्कार केला. यावेळी नाहीद यांच्या जिद्दीची दर्डा यांनी प्रशंसा केली.
नेत्रहीन असूनही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर स्वत:च्या पायावर उभे राहत शेख नाहीद हे औरंगाबादेत वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करीत आहेत. जन्मत: त्यांना एका डोळ्याने काहीच दिसत नव्हते, तर दुसऱ्या डोळ्याने फार कमी दिसत होते. दुसºया डोळ्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली; परंतु झाले उलटेच. दुसºया डोळ्यानेही काहीच दिसेनासे झाले. मात्र, याही स्थितीत त्यांनी जिद्द सोडली नाही व ते वृत्तपत्र विक्रेता झाले.
आज त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरच चालतो. औरंगाबादेतील एन-७ सिडको भागातील वृत्तपत्र वितरण केंद्रावर शेख नाहीद दररोज पहाटेच जातात. यासाठी त्यांना जवळपास राहणारे कोणीही मदत करतात. तेथून वृत्तपत्रे घेऊन ते आझाद चौकाजवळील रहेमानिया चौकातील आपल्या जागेवर परततात व तेथेच विक्री करतात.
काही तासांमध्ये वृत्तपत्रांची विक्री करून ते घरी परततात. नेत्रहीन असूनही ते हिशोबाचे पक्के आहेत. शेख नाहीद यांच्या जिद्दीचे ‘लोकमत’मध्ये कौतुक करण्यात आले.
या सत्कारावेळी ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, ‘लोकमत’चे निवासी संपादक प्रेमदास राठोड, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. खुशालचंद बाहेती, व्यवस्थापक (प्रसार) प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक (जाहिरात) सूरज धाये, प्रसार विभागाचे शेख इश्तियाख व मंगेश कुमठे उपस्थित होते.