निळ्या झेंड्यांच्या दांड्यांना हवे एकीचे बळ !
By Admin | Published: August 26, 2015 11:42 PM2015-08-26T23:42:30+5:302015-08-26T23:42:30+5:30
बीड : दलितांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून निवडणुकांपुरता निळा झेंडा मिरविला जातो. प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये निळ्या झेंड्यांचे दांडे दिसतात;
बीड : दलितांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून निवडणुकांपुरता निळा झेंडा मिरविला जातो. प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये निळ्या झेंड्यांचे दांडे दिसतात;परंतु आता या दांड्यांना एकीचे बळ आवश्यक आहे. त्याशिवास समाजाचा संघर्ष संपणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी बुधवारी सांगितले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी समाजाच्या राजकीय, सामाजिक उपेक्षेवर टिप्पणी करतानाच सामाजिक संघटन बांधणीची गरज असल्याचेही स्पष्ट केले.
‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश. या संदेशाचा समाजाने विसर पडू देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत ओव्हाळ यांनी समाजाला गृहित धरुन राजकारण करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, विविध राजकीय पक्षांमध्ये निळे झेंडे दिसतात. निवडणुका आल्या की, मते ‘कॅश’ करण्यासाठी निळ्या झेंड्यांचे प्रदर्शन केले जाते; परंतु प्रत्यक्षात या झेंड्यांचे दांडे प्रस्थापितांच्याच हाती आहेत. त्यामुळे समाजाच्या प्रश्नांना वाचा फुटत नाही. आजही अनेक गावांत दलितांवर अन्याय- अत्याचार होत आहेत. पावलोपावली संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. अॅट्रॉसिटीसारखे कवच कुंडल असतानाही अत्याचार थांबत नाहीत, हे घातक असल्याचे ते म्हणाले. सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यातच अर्धी शक्ती वाया जात आहे. त्यामुळे मतांसाठी निळे झेंडे घेऊन मिरविणाऱ्यांनी दांडासुद्धा साबूत ठेवला पाहिजे. समाजाच्या प्रतिष्ठेचा व स्वाभिमानाचाही विचार झाला पाहिजे, असे डॉ. ओव्हाळ यांनी सांगितले. समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे दिवस आता संपले आहेत. समाज जागृत होत आहे;परंतु अजूनही काही जण समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. समाजाला आरक्षण मिळाले;परंतु ध्वजारोहणाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापित राजकारणी दलित समाजातील बेरोजगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढतात. समाजातील तरुणांना व्यसनाच्या आहारी लावतात. हे कोठे तरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. ओव्हाळ यांनी व्यक्त केली.
राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक संघटन उभे केले जाणार आहे. प्रस्थापितांविरुद्ध टक्कर देण्यासाठी संघटन केल्याशिवाय पर्याय नाही, असेही डॉ. ओव्हाळ म्हणाले. (प्रतिनिधी)
सामाजिक कार्याच्या तळमळीतून जितेंद्र ओव्हाळ यांनी वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक संघटनही उभे केले आहे. २०१० मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचची स्थापना केली. या माध्यमातून तरुणांची मोठी फौज निर्माण केली असून, विविध विषयांवर आंदोलने छेडून रान पेटविले आहे. येणाऱ्या काळात समाजकारण अधिक जोमाने करायचे असून शेवटपर्यंत लढा सुरुच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दलित समाजाची प्रशासनाकडूनही उपेक्षा सुरु असल्याची टीका डॉ. ओव्हाळ यांनी केली. ते म्हणाले, प्रश्न गायरान जमिनीचा असो की, घरकुलाचा जागोजागी अडवणूक होते. खालापासून ते वरपर्यंतची यंत्रणा प्रस्थापितांच्या इशाऱ्यावर चालते. त्यामुळे हा दुजाभाव थांबला पाहिजे, असेही ओव्हाळ म्हणाले.