विदेशी विद्यार्थ्यांचा रोखला थेट शैक्षणिक प्रवेश; ‘सीईटी सेल’ कडे करावी लागेल आधी नोंदणी
By विजय सरवदे | Published: April 8, 2023 06:50 PM2023-04-08T18:50:19+5:302023-04-08T18:50:37+5:30
उच्च शिक्षण विभागाने याची जबाबदारी ‘सीईटी सेल’वर सोपविली आहे. या सेलमध्ये ‘फॉरेन स्टुडंट्स ॲडमिशन’ हा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : यापुढे विदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये थेट प्रवेश घेता येणार नाही. त्यांना राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (सीईटी सेल) पसंतीच्या ठिकाणी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी अगोदर ‘सीईटी सेल’च्या वेबसाइटवर ‘फॉरेन स्टुडंट्स ॲडमिशन’ पोर्टलावर नोंदणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्षापासून अमलात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांबद्दल एका क्लिकवर माहिती मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘एक खिडकी’ योजना अमलात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उच्च शिक्षण विभागाने याची जबाबदारी ‘सीईटी सेल’वर सोपविली आहे. या सेलमध्ये ‘फॉरेन स्टुडंट्स ॲडमिशन’ हा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. विदेशी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण विद्यापीठ किंवा महाविद्यालये तसेच राहण्यासाठी सोयीस्कर शहर हवे असते. त्यामुळे ‘सीईटी सेल’ने विद्यापीठे तसेच उच्च शिक्षण देणाऱ्या संलग्नित महाविद्यालयांकडून पायाभूत सुविधा, प्रशिक्षित अध्यापक, ग्रंथालये, प्रयोगशाळा, वसतिगृहे आदी माहिती मागविली आहे. महाविद्यालयांनी ही माहिती संलग्नित विद्यापीठांकडे सादर करायची आहे. त्यानुसार ८ एप्रिलपर्यंत महाविद्यालयांनी संबंधित माहिती अपलोड करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
शहरात सुमारे ४०० विदेशी विद्यार्थी
सध्या शहरात अफगाणिस्तान, अंगोला, बांगलादेश, पश्चिम आफ्रिका (जीबूती), इथोपिया, घाना, इराक, जॉर्डन, केनिया, दक्षिण आफ्रिका (लिसोथो), दक्षिण आफ्रिका (मलावी), पूर्व आफ्रिका (मोझांबिक), नेपाळ, पॅलेस्टाईन, श्रीलंका, सुदान, सिरीया, टांझानिया, येमेन, झिंबाब्वे, थायलंड आदी देशांतील सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील जवळपास ३०० विद्यार्थी विद्यापीठात पीएच.डी. करतात, तर उर्वरित विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत.
विदेशी विद्यार्थ्यांची जबाबदारी विद्यापीठावर
शिक्षणासाठी आलेल्या विदेशी विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची जबाबदारी विद्यापीठातील ‘फाॅरेन असिस्टन्स सेल’कडे आहे. मग, तो विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत असला तरीही. या सेलचे संचालक डॉ. विकास कुमार यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक वर्षात विदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. राज्याच्या ‘सीईटी सेल’च्या संकेतस्थळावर विद्यापीठे, महाविद्यालये, तेथे असलेले अभ्यासक्रम, कॅम्पसमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, निवासाची व्यवस्था आदी सर्व माहिती असेल. विदेशी विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार संबंधित ठिकाणी प्रवेश घेण्याची इच्छा ‘सीईटी सेल’कडे व्यक्त करतील.