बीडसांगवीत वृद्धाचा दारुसाठी खून
By Admin | Published: October 9, 2016 11:59 PM2016-10-09T23:59:51+5:302016-10-10T00:03:03+5:30
आष्टी : तालुक्यातील बीडसांगवी येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने केलेल्या मारहाणीत रावसाहेब नागू डुकरे (६०) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली.
आष्टी : तालुक्यातील बीडसांगवी येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने केलेल्या मारहाणीत रावसाहेब नागू डुकरे (६०) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, बीडसांगवी येथे रावसाहेब डुकरे हे शनिवारी रात्री आठ वाजता आपल्या घरसमोरील अंगणात झोपलेले होते. यावेळी तेथे विष्णू जगन्नाथ गुंड, अशोक विश्वनाथ ढवण (दोघे रा. गणगेवाडी ता. आष्टी) हे आले. त्यांनी रावसाहेब यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, रावसाहेब यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे ते दोघेही तेथून निघून गेले. दरम्यान, पहाटे ते दोघे इतर तिघांसमवेत तेथे मद्यप्राशन करुन आले. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने जगन्नाथ गुंड, अशोक ढवण व तीन आनोळखी इसमांनी मिळून काठीने डोक्यात व पायांवर मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विजय रावसाहेब डुकरे याच्या फिर्यादीवरून विष्णू गुंड, अशोक ढवण यांच्यासह अनोळखी तिघांवर आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट दिली.
दोन्ही आरोपींना जेरबंद केले असून उर्वरित तिघांचा शोध सुरु असल्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)