पैसे मागितल्याने ‘त्या’ परिचारिकेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:24 AM2018-04-24T00:24:40+5:302018-04-24T00:25:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : जोगेश्वरीत सापडलेल्या ‘त्या’ अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना सहा दिवसांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : जोगेश्वरीत सापडलेल्या ‘त्या’ अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना सहा दिवसांत यश आले. आरोपी वाहनचालकाला पोलिसांनी जेरबंद केले. दोघांचे अनैतिक संबंध असून, तिने पैसे मागितल्याने आरोपीने तिचा गळा आवळून खून केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डी. एन. मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
जोगेश्वरी शिवारातील एक्सलंट कंपनीमागे १८ एप्रिलला अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तिचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत दुसऱ्याच दिवशी मृतदेहाची ओळख पटविली. खून झालेल्या महिलेचे नाव संगीता विलास शिंदे (४४, रा. सावतानगर, नेवासा फाटा) असून, ती खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
मोबाईलमुळे खुनाचा उलगडा
संगीताचा खून झालेल्या ठिकाणी कुठलाही पुरावा पोलिसांना मिळाला नव्हता. पोलिसांनी मृताचा मोबाईल क्रमांक मिळविला. सायबर सेलकडून मोबाईल कॉल्सचे डिटेल्स काढून तिचा कुणाकुणाशी संपर्क झाला याची माहिती घेतली. तिचे संभाषण शेख जावेद याच्याशी झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु शेख जावेद कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे समोर आले. अधिक तपासाअंती त्याचा मोबाईल इम्रानखान पठाण (रा.जोगेश्वरी) हा वापरत असल्याचे समजले. त्यामुळे पोलीस पथकाने रविवारी रात्री संशयित इम्रानखान पठाण (२८) यास हुसेन कॉलनीतून ताब्यात घेतले.
वर्षभरापासून अनैतिक संबंध
इम्रानखान पठाण यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. आरोपी इम्रानखान हा अनुज सुराशे (रा.बजाजनगर) यांच्या वाहनावर चालक आहे. गतवर्षी इम्रानखान वाहन घेऊन अहमदनगरहून औरंगाबादकडे येत असताना त्याची संगीताबरोबर ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. वर्षभरात संगीतासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.
१७ एप्रिल रोजी इम्रानखान हा नेवासा फाटा येथे गेला व संगीताला भेटला. यानंतर दोघेही छोटा हत्तीमधून (क्र. एमएच-२० ईजी ३१६०) रात्री औरंगाबादकडे निघाले होते. घटनेच्या दिवशी दोघांचेही मोबाईल रात्री ८.१२ मिनिटाच्या सुमारास बंद झाले होते. जोगेश्वरी शिवारात येत असताना रात्री इम्रानखानने संगीताकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र संगीताने पैसे दिल्याशिवाय संबंधास नकार दिल्यामुळे दोघात वाद झाला. या वादावादीत संगीताने शिवीगाळ केल्यामुळे इम्रानखानने कंपनीजवळ गाडी थांबवून दोरीने तिचा गळा आवळला. ती निपचित पडल्यानंतर गाडीतून रस्त्यावर फेकून घटनास्थळावरून तो फरार झाला. यानंतर रात्री बजाजनगरात गाडी उभी करून इम्रानखान गाडीतच झोपी गेला होता, असे मुंडे यांनी सांगितले.
पोलिसांना १० हजारांचे रिवार्ड
या प्रकरणाचा अवघ्या सहा दिवसांत छडा लावून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी इम्रानखान पठाण यास जेरबंद केले.
मोलाची कामगिरी बजावणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, फौजदार लक्ष्मण उंबरे, अमोल देशमुख, पोहेकॉ. रामदास गाडेर, विजय होनवडतकर, पोना. फकीरचंद फडे, शैलेंद्र अडियाल, पोकॉ. बाळासाहेब आंधळे, पोकॉ. देवीदास इंदोरे, पोकॉ. बाबासाहेब काकडे आदींचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहा. आयुक्त डी. एन. मुंडे यांनी कौतुक करून १० हजारांचे रिवार्ड जाहीर केला आहे.
कठुआ आंदोलनात इम्रान
खून करणारा आरोपी इम्रानखान पठाण हा जम्मू- काश्मीरमधील कठुआ बलात्कारातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी १५ एप्रिल रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी आला होता. एकीकडे न्याय मागण्यासाठी आलेला इम्रानखान हाच खून प्रकरणात अडकल्याने या प्रकरणाची औद्योगिकनगरीत जोरात चर्चा सुरू आहे.