रक्ताचे नातेही दुरावले ! कोरोना रुग्णाचा मृतदेह चार दिवसांपासून घाटी रुग्णालयात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:19 PM2021-04-17T17:19:18+5:302021-04-17T17:21:57+5:30
corona virus in Aurangabad समाजसेवा अधीक्षकांकडून चार दिवसांपासून नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे
औरंगाबाद : कोरोनामुळे जवळचे लोकही दूर जात आहेत. रुग्णाकडे पाठ फिरवित आहेत. याचीच प्रचिती घाटीत आली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एका रुग्णाचा मृतदेह ४ दिवसांपासून शवागृहातच पडून आहे. कारण अंत्यसंस्कार आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नातेवाइकांचा शोध लागत नाही. मृत्यूनंतरही सुटका होत नसल्याची मन हेलावणारी परिस्थिती पहायला मिळत आहे.
विजय पांडुरंग मोरे (५२, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे मृत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ८ एप्रिल रोजी ते घाटीत भरती झाले होते. उपचार सुरू असताना १३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर घाटीतील समाजसेवा अधीक्षकांनी रुग्ण दाखल होताना दिलेल्या दोन्ही मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला; परंतु एक मोबाइल नंबर बंद होता. तर दुसऱ्या नंबरवर संपर्क झाला; मात्र नातेवाईक असल्यासंदर्भात स्पष्टता झाली नाही. त्यामुळे १३ एप्रिलपासून विजय मोरे यांचा मृतदेह घाटीतील शवागृहातच आहे. समाजसेवा अधीक्षकांकडून चार दिवसांपासून नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु अद्यापही शोध लागलेला नाही. नातेवाइकांशिवाय अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे; परंतु हद्दीच्या प्रश्नात ही प्रक्रियाही अडकली आहे. उपचारासाठी नोंदविण्यात आलेले नाव बरोबर आहे की नाही, यावरही शंका उपस्थित केली जात आहे.
पोलिसांना माहिती कळविली
ढाकेफळ येथून रुग्ण रेफर झाला होता. दिलेल्या पत्त्यानुसार गावात विचारणा करण्यात आली; परंतु पोलीस पाटील यांनी असे कोणी नाही, असे सांगितले. दिलेल्या दोन मोबाइल नंबरपैकी एक बंद आहे, तर दुसरा राँग नंबर असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.