जालना रोडवर महिलेचा भोसकून खून
By Admin | Published: February 17, 2016 11:59 PM2016-02-17T23:59:32+5:302016-02-18T00:09:09+5:30
करमाड : आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेला कुंभेफळ शिवारात गजबजलेल्या जालना रोडलगत चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला.
करमाड : आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेला कुंभेफळ शिवारात गजबजलेल्या जालना रोडलगत चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. सुनीता प्रकाश चौघुले (४०, रा. एन-२, ठाकरेनगर) असे तिचे नाव आहे. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला की, इतर काही कारणाने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भर रस्त्यालगत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता चौघुले यांचे छोटे भाऊ मधुकर शिरसाठ हे कुंभेफळ शिवारात जालना रोडलगत असलेल्या माऊलीनगरात राहतात. शिरसाठ हे आपल्या मूळ गावी वडिलांना भेटण्यासाठी गेलेले होते. गावाहून परतत असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांना बहीण सुनीताने फोन केला आणि ‘आज मी तुम्हाला भेटायला येते’ असे म्हणाली. तेव्हा शिरसाठ यांनी मी बसने सायंकाळी कुंभेफळला पोहोचले, असे सांगितले. त्यावर सुनीताने मग जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात उतरल्यानंतर मला फोन करा, असे म्हटले.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केम्ब्रिजजवळ उतरल्यानंतर त्यांनी बहिणीला फोन केला; परंतु फोनवर आवाज नीट येत नसल्याने दोघांमध्ये बोलणे होऊ शकले नाही. मग शिरसाठ सरळ घरी निघून आले.
घरापासून काही अंतरावरच...
बहीण येणार असल्याने घरी स्वयंपाकाची तयारी करीत शिरसाठ बसले होते. तोच साडेसात वाजेच्या सुमारास बाहेर आरडाओरड सुरू असल्याचा आवाज शिरसाठ कुटुंबाच्या कानावर पडला. काय झाले हे पाहण्यासाठी कुटुंब बाहेर आले. तेव्हा घरापासून सुमारे ३०० फूट अंतरावर माऊलीनगरकडून कुंभेफळ कमानीकडे जाणाऱ्या रोडवर काही लोक जमलेले असल्याचे नजरेस पडले. त्यामुळे पाहण्यासाठी हे कुटुंबही तेथे गेले. तेथे पोहोचताच त्यांना धक्काच बसला.
कारण गर्दीत खाली रक्ताच्या थारोळ्यात शिरसाठ यांची बहीण सुनीता गंभीर जखमी अवस्थेत पडलेली असल्याचे दिसले. ती कुंभेफळ कमानीकडे जाणाऱ्या रोडच्या दिशेने बोट दाखवून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती; परंतु तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. बरगडीत धारदार शस्त्राने तिला भोसकण्यात आलेले असल्याचे नजरेस पडताच शिरसाठ यांनी शेजारांच्या मदतीने तिला जीपमध्ये टाकून घाटीत उपचारासाठी आणले. उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाला.