संभाजीनगर भागात तरुणाचा खून
By Admin | Published: June 10, 2014 12:28 AM2014-06-10T00:28:44+5:302014-06-10T00:56:28+5:30
जालना : येथील संभाजीनगर भागातील पाटील गल्लीत प्रमोद एकनाथ माने (३६) यांचा खून करण्यात आला.
जालना : येथील संभाजीनगर भागातील पाटील गल्लीत प्रमोद एकनाथ माने (३६) यांचा खून करण्यात आला. ही घटना ९ जूनच्या पहाटे ४.२१ ते ६ वाजेच्या सुमारास घडल्याचा संशय सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पी.के. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.
याप्रकरणी मयताचा भाऊ राजेंद्र एकनाथ माने (४०) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खुनाच्या घटनेनंतर सदर बाजार पोलिस ठाण्यात जमावाने गर्दी केली होती.
येथील बालाजी मंदिराजवळ पाटील गल्लीत ही घटना घडली. आरोपींनी प्रमोदला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्याला राहत्या घरासमोर आणून टाकले. त्याच्या डोक्याला, छातीला जबर मार लागला. सुरूवातील पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात नातेवाईकांना सांगितले होते. ही नोंदही पोलिसांनी घेतली होती. दरम्यान, छावा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांना ठासून सांगितले. त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला.
परिसरातील काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद माने हा अनेकवेळा रस्त्याने पैसे मोजत जात असे. त्यामुळे पैसे काढून घेण्यासाठी कोणीतरी त्याला मारहाण केली असावी, असा संशय व्यक्त केला.
मात्र कुलकर्णी यांनी सांगितले, प्रमोद माने यांच्या वागणुकीविषयी परिसरातील एकाही व्यक्तीची तक्रार नाही. कोणाशी त्याचा जास्त संबंधही येत नव्हता. मात्र महिना-दीड महिन्यापूर्वी पत्नी निघून गेल्याने तो त्रासलेला होता. त्याला दारू पिण्याची सवय होती. त्यानंतरही तो कोणाशीही बोलत नव्हता.
८ जूनच्या रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत तो सारखा गच्चीवरून खाली येत होता, खालून पुन्हा वर येत होता. हा प्रकार तीन ते चार वेळा केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. यावरून तो बेचैन होता, असा अंदाज आम्ही बांधल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले, आपण रात्रीच्या गस्तीवर याच भागात होतो. आपण रात्रीपासून पहाटे ४.२१ वाजेपर्यंत गस्ती टाकली. शेवटची गस्तही ४.२१ वाजता मारली. त्यावेळी या भागात आपणास काहीच आढळून आले नाही.
सकाळी ६ वाजेच्या सुमारास लोकांना प्रमोद माने हे जखमी अवस्थेत दिसले. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घातपात आणि अपघात याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
याप्रकरणी अधिक तपास सुरू असून तपासाद्वारे आणखी काही माहिती बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)