भोरखेड्यात ‘खून का बदला खून’
By Admin | Published: July 14, 2017 12:32 AM2017-07-14T00:32:22+5:302017-07-14T00:33:22+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील भोरखेडा येथे तेरा वर्षांपूर्वी विठ्ठल बबन रोकडे यांचा शेतीच्या वादातून खून झाला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील भोरखेडा येथे तेरा वर्षांपूर्वी विठ्ठल बबन रोकडे यांचा शेतीच्या वादातून खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी विठ्ठल रोकडे त्यांच्या मुलांनी वडिलांना मारणाऱ्या व्यक्तीचा बुधवारी रात्री डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केला. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की (रा.भोरखेडा) यांनी २००४ मध्ये विठ्ठल रोकडे यांचा खून केला होता. या प्रकरणी खुनाच्या आरोपात गावातील प्रकाश गंगाराम रोकडे (५५) याने कायदेशीर शिक्षा भोगली आहे. सध्या गावात राहत असलेल्या प्रकाश रोकडे यास विठ्ठल रोकडे यांची मुले दत्ता विठ्ठल रोकडे व लक्ष्मण विठ्ठल रोकडे ‘तू आमच्या बापास ठार मारले आहे, आम्ही तुला संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, अशा धमक्या द्यायचे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित सुशीला रोकडे व त्यांची मुले दत्ता रोकडे, लक्ष्मण रोकडे यांनी संगनमत करून भोरखेडा येथील गट २६१ मध्ये प्रकाश रोकडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचा खून केला. या प्रकरणी प्रकाश रोकडे यांचा मुलगा गणेश याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर पारध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले
आहे.
भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी गुरुवारी घटनास्थळी चौकशी केली. सहायक उपनिरीक्षक सुदाम भागवत तपास करीत आहेत.