सबसिडीचे निळे रॉकेल हळूहळू बंद होणार
By Admin | Published: May 21, 2016 12:03 AM2016-05-21T00:03:15+5:302016-05-21T00:12:33+5:30
औरंगाबाद : सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या निळ्या रॉकेलचा कोटा शासनाने कमी केला आहे.
औरंगाबाद : सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या निळ्या रॉकेलचा कोटा शासनाने कमी केला आहे. आता पेट्रोल-डिझेलप्रमाणे पांढऱ्या रंगाचे रॉकेल बाजारात खुल्या मार्केट रेटनुसार उपलब्ध करून देण्याचा घाट शासनाने घातला आहे. हे रॉकेल विक्रीसाठी घाऊक, किरकोळ परवाने देण्यासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सबसिडीचे निळे रॉकेल हळूहळू बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरुवातीला सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रेशन दुकानांमार्फ त कार्डधारकांना रॉकेल पुरवठा होत असे. त्यानंतर गॅस सिलिंडर आल्याने रॉकेलचा कोटा हळूहळू कमी होत गेला. रॉकेलचा कोटा ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे. सध्या फक्त पिवळ्या कार्डधारकांसाठीच रॉकेल दिले जाते. गॅस उपलब्ध होत असल्याने रॉकेलची ओरड कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाने पांढरे रॉकेल खुल्या बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी ‘समांतर केरोसीन बाजार योजना’ असे नाव देण्यात आले आहे. बीपीसी, एचपीसी, आयओसी या कंपन्यांमार्फत संबंधित घाऊक वितरकांना रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी पांढऱ्या रॉकेलचा व्यवसाय करण्यासाठी वितरकांना तीनपैकी एका कंपनीशी करार करावा लागणार आहे. केंद्र शासनाच्या परराष्ट्र धोरणाचाच हा एक भाग असून, भारताबाहेर पांढऱ्या रॉकेलचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र, तिकडे या रॉकेलला मागणी नाही. त्यामुळे हा साठा भारतात विकण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.