निळ्या रॉकेलचा काळाबाजार
By Admin | Published: November 4, 2015 12:08 AM2015-11-04T00:08:27+5:302015-11-04T00:25:21+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड स्वस्त धान्य असो की, रॉकेल याचा काळा बाजार करणारी लॉबी दिवसेंदिवस प्रभावी होत आहे. गोरगरिबांसाठी महिन्याकाठी येणारे रॉकेल घाऊक ठेकेदार काळ्या बाजारात नेवून विकत आहेत
व्यंकटेश वैष्णव, बीड
स्वस्त धान्य असो की, रॉकेल याचा काळा बाजार करणारी लॉबी दिवसेंदिवस प्रभावी होत आहे. गोरगरिबांसाठी महिन्याकाठी येणारे रॉकेल घाऊक ठेकेदार काळ्या बाजारात नेवून विकत आहेत. याबाबत अधिकारी बोलायला गेले तर त्यांना चक्क दमदाटी केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिकारी बोलायला गेले की, रॉकेल विक्री संघटनेकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रकार केला जातो. जिल्ह्यासाठी महिन्याला २० लाख ५४ हजार लिटर रॉकेलची आवक केली जाते. पुणे, नगर, सोलापूर आदी ठिकाणांवरून रॉकेलचा कोटा उचलला जातो. कोटा उचलून रॉकेलचे टँकर संबंधीत तहसीलदारांकडे तपासणीसाठी येते. तपासणी झाल्यानंतर ठेकेदार अर्ध घाऊक ठेकेदारांकडे टँकर घेवून जातात. परंतु अनेक अर्धघाऊक ठेकेदारांपर्यंत रॉकेलचे टँकर पोहचविण्यापूर्वीच ठेकेदारांकडून रॉकेलचा काळा बाजार केला जातो. ही वस्तूस्थिती आहे. सणासुदीतही रॉकेल नाही बीड शहरातील काही भाग व तालुक्यातील बहुतांश गावांना आॅक्टोबर महिन्यात रॉकेलच पोहोचलेले नाही. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांचे म्हणणे आहे की, संबंधीत ठेकेदारांनी यावेळी आम्हाला रॉकेल देण्यास टाळाटाळ करतात. सध्या सणा-सुदीचे दिवस आहेत. गोर-गरिबांना रॉकेलची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र घाऊक ठेकेदारांकडून रॉकेल काळ्या बाजारात विक्री केले जाते. यामुळे गोरगरीबांना रॉकेल मिळत नाही. हवा कारवाईचा बडगा जिल्हयात एकूण १२ घाऊक तर १६३ अर्धघाऊक ठेकेदार आहेत. यामध्ये घाऊक ठेकेदारांपैकी दोघाजणांचे यापूर्वीच रॉकेल परवाने निलंबीत केलेले आहेत. यामध्ये परळी व बीड येथील प्रत्येक एका ठेकेदाराचा समावेश आहे. सणासुदीतही रॉकेल मिळत नसेल तर ठेकेदारांचे रॉकेल परवाने निलंबीत करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. परस्परच फाडली जातात बिले ज्या ठेकेदाराकडे रॉकेलची ‘डिलरशिप’ आहे. त्यातील काही ठेकेदार दुकानदारांच्या परस्परच त्यांच्या नावावर बिल फाडून कागदोपत्री पावती बनवून रॉकेल काळ्या बाजारात विकत असल्याचा प्रकार करतात व दुकानदारानेच रॉकेल उचलले नाही असा कांगावा करतात. याला लगाम लावणे आवश्यक असल्याचे स्वस्तधान्य दुकानदाराच सांगतात.धिकारी, कर्मचाऱ्यांना ठेकेदारांची डोकेदुखी मागील दोन-अडीच महिन्यापासून जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून संतोष राऊत हे काम पहात आहेत. जिल्हा पुरवठा विभागाला शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या कार्यपध्दतीला कर्मचारी देखील सहकार्य करत आहेत. परंतु स्वस्त धान्य असो की, रॉकेल असो, याचा काळा बाजार करण्याची सवय ठेकेदारांना लागलेली आहे. यामुळे घाऊक ठेकेदार पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डोके दुखी ठरत आहेत.