पालिकेच्या घंटागाड्या झाल्या गायब?
By Admin | Published: June 2, 2014 12:26 AM2014-06-02T00:26:14+5:302014-06-02T00:53:52+5:30
जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच घंटागाड्याही गायब झाल्या असल्याने शहरातील विविध भागांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजा-वाजा करीत घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. नवीन जालना भागातील स्वच्छतेचे कंत्राट खाजगी एजन्सीला देण्यात आले. सोसायटीला बहाल केलेल्या कामाची मुदत संपली आहे. नवीन जालना भागातील फुलबाजार, कपडाबाजार, फुले मार्केट, सिंधीबाजार, सराफा रोड, टांगा स्टॅण्ड-मामा चौक या भागात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घंटागाडी धावणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत पालिकेच्या घंटागाड्या फिरकल्या नाहीत. दरम्यान, दोन आठवड्यात संपूर्ण नवीन जालना स्वच्छ व सुंदर होईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र ते सर्वांच्या विस्मृतीत गेले. कधीकधी जुना जालना भागात घंटागाड्या येत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गाड्या येत नसल्याने ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. या भागात सफाई कर्मचारी वळविण्यात आले होते. मात्र, तेही नियमितपणे सफाई करीत नाहीत, अशी ओरड होत आहे. मान्सूनपूर्व कामे हाती घेत पालिकेने या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र, नाल्यांमधील घाण रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते अडचणीचे ठरत आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील केर-कचरा टाकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाड्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात फिरकलेल्याच नाहीत, असे विदारक चित्र आहे. त्यामुळे शहराची अवस्था कचराकुंडीसारखीच झाली आहे. दरम्यान, पालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून शहरातील प्रतिष्ठित आणि सुजाण नागरिकांनीच स्वच्छतेविषयी पुढाकार घेतला. ‘सिटीजन्स फॉर सिटीजन’ या संस्थेने रविवारी रॅली काढून नागरिकांनीच आप-आपल्या घरातील कचर्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) सफाईची मागणी पालिकेने मान्सूनपूर्व सफाईची कामे हाती घेतली आहेत. यात नाल्यांची सफाई होतांना दिसत आहे. मात्र, शहरातील कचराकुंड्यांवरील घाण साफ करावी, जेणे करून पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही, अशी मागणी होत आहे.