शिक्षिकेवरील लैंगिक अत्याचाराने शिक्षण मंडळाचे गेस्ट हाऊस वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:02 AM2021-08-19T04:02:56+5:302021-08-19T04:02:56+5:30
गेस्ट हाउसमध्ये केवळ पुरुषांनाच राहण्याची व्यवस्था असताना तेथे महिलेला प्रवेश कसा आणि कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला, याविषयी चर्चेला आता ...
गेस्ट हाउसमध्ये केवळ पुरुषांनाच राहण्याची व्यवस्था असताना तेथे महिलेला प्रवेश कसा आणि कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला, याविषयी चर्चेला आता सुरुवात झाली आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागीय कार्यालय रेल्वे स्टेशन रोडवर आहे. या कार्यालयाच्या मागेच गेट हाऊस आहे. बोर्डाच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या बाहेर गावातील दहावी, बारावीचे शिक्षक, कर्मचारी यांना येथे मुक्काम करण्याची गरज भासल्यास त्यांच्या राहण्याची सोय व्हावी याकरिता हे गेस्ट हाऊस आहे.
या गेस्ट हाऊसमध्ये खासगी व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. शिवाय महिलांनाही तेथे प्रवेश नाही. असे असताना लातूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक दीपक प्रल्हाद रणदिवे याने त्याच्या ओळखीच्या शिक्षिकेला या गेस्ट हाउसमध्ये बोलावून अत्याचार केल्याचे नुकतेच समोर आले. २१ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या या घटनेची तक्रार येताच वेदांतनगर पोलिसांनी प्राध्यापक रणदिवेला अटक केली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आणि एसएससी बोर्डाचे गेस्ट हाउस वादाच्या भोवऱ्यात सापडले. तेथे पीडितेला कुणाच्या सांगण्यावरून प्रवेश दिला? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.
पोलिसांनी नुकताच घटनास्थळाचा (गेस्ट हाऊस) पंचनामा केला. गेस्ट हाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, घटनेच्या ८ महिन्यांनंतर तक्रार आल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या या घटनेने शिक्षण क्षेत्राला धक्काच बसला. या घटनेने बोर्डाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली.