मंडळ अधिकारी लाचेच्या सापळ्यात
By Admin | Published: April 18, 2017 11:33 PM2017-04-18T23:33:13+5:302017-04-18T23:37:20+5:30
बीड : लाच स्वीकारताना नवगण राजुरी येथील मंडळ अधिकारी श्रीधर भागवानराव साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
बीड : अवैध वाळू वाहतूक करणारी ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करता ती सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवगण राजुरी येथील मंडळ अधिकारी श्रीधर भागवानराव साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजीनगर ठाण्यानजीक ही कारवाई करण्यात आली.
सुनील आजबे (रा. जामखेड जि. अहमदनगर) हे वाळू वाहतूकदार आहेत. त्यांच्या मालकीचा ट्रक वाळू घेऊन सोमवारी नवगण राजुरी मार्गे अहमदनगरला जात होता. राजुरी शिवारात मंडळ अधिकारी श्रीधर साळुंके यांनी हा ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केला. ट्रक सोडण्यासाठी साळुंके यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. आजबे यांनी त्यांना १० हजार रुपये दिलेही होते. उर्वरित दहा हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले होते.
दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीची ट्रक चालवायची असेल तर प्रतिमाह दहा हजार रुपये हफ्ता द्यावा लागेल, अशी मागणी साळुंके यांनी ट्रकमालक आजबेंकडे केली होती. आजबे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, गजानन वाघ, पोहेकॉ श्रीराम खटावकर, विकास मुुंडे, अमोल बागलाने, प्रदीप वीर, राकेश ठाकूर आदींनी शिवाजीनगर ठाण्याजवळ सापळा लावला. पाच हजार रुपये स्वीकारताच साळुंके यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईने महसूल वर्र्र्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)