परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंडळाचे दावे फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:25 PM2019-02-22T16:25:58+5:302019-02-22T16:29:04+5:30

शहर परिसर आणि ग्रामीण भागात कॉप्यांचा, गैरप्रकारांचा सुळसुळाट असल्याचे उघड झाले.

The board's claims on the first day of the examination fell | परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंडळाचे दावे फोल

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंडळाचे दावे फोल

googlenewsNext
ठळक मुद्देढोरकीनच्या परीक्षा केंद्रात गैरप्रकारपरीक्षेत पोलिसांचा हस्तक्षेपशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई; केंद्र संचालक बदलला

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेत एका हॉलमध्ये २५ विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्याला बसण्यासाठी डेस्कची व्यवस्था करण्याच्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महाविद्यालयांना दिल्या होत्या. पहिल्याच दिवशी मंडळाच्या सूचना ढोरकीन, रांजणगाव आदी ठिकाणी पायदळी तुडविण्यात आल्याचे उघड झाले. ढोरकीन येथील परीक्षा केंद्रात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने भेट देत मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये बारावीची परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त पद्धतीने सुरू असताना शहर परिसर आणि ग्रामीण भागात कॉप्यांचा, गैरप्रकारांचा सुळसुळाट असल्याचे उघड झाले. पैठण तालुक्यातील मानसिंग पवार कनिष्ठ महाविद्यालय, ढोरकीन येथील केंद्राला शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण, विस्तार अधिकारी जे.व्ही. चौरे, एम.आर. सोनवणे यांच्या भरारी पथकाने भेट देत तीन तास ठाण मांडले. या परीक्षा केंद्रावर ५६१ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी १३ विद्यार्थी अनुपस्थित आढळून आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था अवघ्या ६ वर्गांमध्ये करण्यात आली होती. नियमानुसार प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थी असणेच आवश्यक आहे. मात्र, याठिकाणी चार वर्गांत १०८ विद्यार्थी, पाचव्या वर्गामध्ये ७८ आणि सहाव्या वर्गात ५१ विद्यार्थी बसविण्यात आले होते, तसेच एका बेंचवर १ विद्यार्थी असायला हवा.

याठिकाणी प्रत्येक बेंचवर दोन, तीन विद्यार्थी दाटीने बसविण्यात आले होते. विशेष म्हणजे वर्गखोल्या उपलब्ध असताना वापरण्यात आल्या नसल्याचे निरीक्षण पथकाने गोपनीय अहवालामध्ये नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गैरप्रकारामुळे संतापलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मंडळाचे अध्यक्ष, सचिवांना मोबाईलद्वारे माहिती देत त्यांच्या परवानगीने परीक्षा केंद्र संचालक आर.टी. राठोड यांना निलंबित केले, तसेच त्यांच्या जागेवर जि.प. प्रशालेच्या शैलजा रत्नपारखे यांची नेमणूक केल्याचे समजते. शिक्षणाधिकाऱ्यांचे भरारी पथक केंद्रावर परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच दाखल झाले होते. या केंद्रातील परीक्षेच्या सहा वर्गखोल्यांतून तब्बल तीन पोते कॉप्या पकडण्यात आल्या. यानंतरही कॉप्या करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली, तसेच पुढील वर्षी याठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात येऊ नये, असा अहवालही मंडळाला पाठविण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रात पोलिसांचा हस्तक्षेप
ढोरकीन येथील परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेल्या बिडकीन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी परीक्षेत हस्तक्षेप केला असल्याचेही भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. पोलिसांनी परीक्षा केंद्रात बेकायदेशीरपणे तीन तास व्हिडिओ शूटिंग केली, तसेच पोलिसांनी परीक्षा वर्गात फेरफटका मारून विद्यार्थ्यांच्या कॉप्या पकडल्या आहेत. पोलिसांना याविषयी अधिकार नसताना हस्तक्षेप केल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे तक्रार करीत मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना गोपनीय अहवाल पाठविला आहे.

रांजणगावात विद्यार्थ्यांना खाली बसवले
रांजणगाव येथील स्व. शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. परीक्षेत एका वर्गात २५ विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्याला बसण्यासाठी डेस्कची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, या विद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क खाली जमिनीवर बसून पेपर द्यावा लागला आहे. वर्गात डेस्कची सुविधा आहे या विश्वासापोटी अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी पॅडही आणलेला नव्हता. अशा विद्यार्थ्यांना खाली बसून पेपर सोडविताना मोठी कसरत करावी लागली असल्याचे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याविषयी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव सुगाता पुन्ने म्हणाल्या की, याविषयीचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मिळाल्यास केंद्र संचालकावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

संस्थाचालक मुख्याध्यापकाची सारवासारव
स्व. शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक एस. एस. बनकर म्हणाले की, परीक्षा मंडळाने उशिरा इंडेक्स नंबर दिल्यामुळे केंद्रावर बेंच तात्काळ उपलब्ध करता आले नाहीत. या केंद्रातील फक्त दोन हॉलमध्ये बेंच अपुरे पडले आहेत. यासंदर्भात संस्थाचालक सोमीनाथ बनकर म्हणाले की, गावातील जि.प. शाळेचे डेस्क मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कमी उंचीचे असल्याने तसेच परीक्षार्थींची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने बेंच आणले नाहीत.

बोर्डाला अहवाल पाठविणार
रांजणगावातील स्व. शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर पुरेशा भौतिक सुविधा तसेच बेंच नसल्याची तक्रार आली आहे. परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे यासंदर्भात परीक्षा मंडळाकडे अहवाल सादर करणार असल्याचे शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.

विभागीय मंडळात अनागोंदी कारभार
औरंगाबाद विभागीय मंडळाचा पदभार अमरावती मंडळाचे शरद गोसावी यांच्याकडे आहे. पूर्णवेळ सचिव असलेल्या सुगाता पुन्ने यांच्यावर सर्व जबाबदारी आहे. मात्र, हॉल तिकीटमधील चुका, प्रश्नपत्रिका पाठविण्याचे नियोजन, भरारी पथकांचे नियोजन, वादग्रस्त परीक्षा केंद्रांवरील बंदोबस्त आदींची माहितीही सचिवांकडे नसल्याचे बुधवारी दिसून आले होते. परीक्षेच्या दिवशीही पुन्ने यांच्याकडे अपडेट माहिती नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सहसचिवांकडून माहिती घ्या, असा निरोप दिला. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे परीक्षेपूर्वीच स्पष्ट झाले.

अहवाल मागविण्यात आला आहे 
रांजणगाव येथील स्व. शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना खाली बसविण्यात आले असल्याची माहिती समजली. या विद्यालयाच्या केंद्र संचालकाकडून अहवाल मागविण्यात आला असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांच्या डेस्कची व्यवस्था केली नसल्याचे आढळून आल्यास विद्यालयाचे परीक्षा केंद्र ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारश मंडळाकडे केली जाईल.
-डॉ. बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Web Title: The board's claims on the first day of the examination fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.