मोमबत्ता तलावात महिनाभरात नौकाविहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:25 AM2017-10-23T01:25:09+5:302017-10-23T01:25:09+5:30
दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात जलविहारासाठी महिनाभरातच दहा नौका अवतरणार आहेत.
विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे पाऊल पडते पुढे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने याठिकाणी फारसे काही केले नसले, तरी जिल्हा परिषदेने मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेला नौकाविहार प्रकल्पाचा संकल्प आता वास्तवात उतरला आहे. दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात जलविहारासाठी महिनाभरातच दहा नौका अवतरणार आहेत.
औरंगाबादेतीलच एका रिसोर्ट चालकाला मोमबत्ता तलावात नौकाविहार चालविण्याचे कंत्राट मिळाले असून, जिल्हा परिषदेने यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. असे असले तरी सदरील कंत्राटदार संस्थेकडून जिल्हा परिषदेला पहिल्या वर्षात प्रति महिना ३० हजार रुपये भाडे मिळणार आहे. याशिवाय नौकाविहारासाठी पर्यटकांना दिले जाणारे तिक ीट हे जिल्हा परिषद साक्षांकित करून देणार आहे. वर्षभरात नौकाविहार प्रकल्पाला मिळणाºया उत्पन्नाचा अभ्यास करून पुढे मग सदरील संस्थेकडून भाडे घ्यायचे की उत्पन्नात भागीदारी घ्यायची, याचा निर्णय जिल्हा परिषद घेणार आहे. विशेष म्हणजे, मोमबत्ता तलावातील नौकाविहार प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न हे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत स्वत:च्या विकासकामांना वापरणार नाही, तर त्यातून मोमबत्ता तलाव परिसराचा विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला. समितीने मागील दोन वर्षांपूर्वी या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी सव्वाकोटी रुपयांचा निधीही दिला होता. त्यातील ६२ लाख रुपये खर्चून मोमबत्ता तलावाच्या ठिकाणी बोटिंगतळ, खिडकीघर, कॅन्टीन, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी इतर सुविधांचे बांधकाम केले. नौकाविहार चालविण्यास देण्यासाठी जिल्हा परिषदेने चार वेळा ई-निविदा काढल्या. मात्र, एकही सक्षम संस्था पुढे आली नाही. अखेर दोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्च न होऊ शकल्यामुळे निधी शासनाला परत करावा लागला. अनंत अडथळे पार करत जिल्हा परिषदेने मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी त्या संस्थेसोबत पाच वर्षांचा करार पूर्ण केला. सदरील संस्था ८ पॅडल बोटी आणि २ स्पीड बोटी खरेदी करणार आहे. लाईफ गार्ड असतील. सुरक्षेच्या सर्व साधनांनी युक्त नौकाविहार महिनाभराच्या आत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.