खदानीजवळ आढळला मृतदेह; ओळख पटविल्यानंतर मृताच्या वडिलांच्या आक्रोशाने सारे सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:24 PM2024-07-12T12:24:13+5:302024-07-12T12:24:33+5:30
तरुणाचा डोक्यात दगड मारून निर्घृनपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे
- संतोष उगले
वाळूज महानगर :डोक्यात दगड मारून तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना वडगाव गट नंबर खदान परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर सिडको ते वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर, खदानीलगत अंदाजे ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेतील मृतदेह सकाळी सात वाजेच्या शिफ्टसाठी पायी जाणाऱ्या महिलांच्या निदर्शनास आला. घाबरलेल्या महिलांनी फोनकरून ही माहिती त्यांच्या पतीला दिली. बघता बघता माहिती सर्वत्र पसरल्याने सकाळी आठवाजेपर्यंत घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे विशेष शाखेचे योगेश शेळके, डिबी पथकाचे विलास वैष्णव आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. मारेकऱ्याने वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दगडाने ठेचून खून करत मृतदेह लगतच्या खदान परिसरात फेकून पळ काढला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे पोलिसांना घटनास्थाळावरून मयताच्या चप्पल जोड सोबत रक्ताने मखलेली मारेकऱ्याची चप्पल देखील आढळून आली. घटनास्थळी श्वानाला पाचरण करण्यात आले होते. श्वान लगतच्या दगडाच्या ढिगाऱ्या भोवती आणि नंतर मृतदेह परिसरातच घुटमळत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
अखेर ओळख पटली, वडिलांचा आक्रोश
मृतदेहाजवळ कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे किंवा मोबाईल आढळून आला नाही. यामुळे ओळख पटविण्यात अडचण आली. मृताच्या उजव्या हातावर 'आई' असे नाव गोंदलेले दिसून आले. पोलिसांनी सरपंच सुनील काळे व इतर स्थानिकांना बोलावून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे मृताच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह असल्याचे सांगत एकाच आक्रोश केला. मृताचे नाव शैलेश विठ्ठल दौंड असे असून तो बजाजनगर येथील रहिवासी आहे.