देवगिरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; दोघींना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:00 PM2022-09-12T12:00:07+5:302022-09-12T12:00:22+5:30

मदतीसाठी गेलेला पोलीस कर्मचारी देखील थोडक्यात बचावला आहे

Body of girl found who drowned in Devagiri river flood in Tisgaon | देवगिरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; दोघींना वाचविण्यात यश

देवगिरी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; दोघींना वाचविण्यात यश

googlenewsNext

वाळूज महानगर (औरंगाबाद) : कपडे धुण्यासाठी तीसगाव शिवारातील देवगिरी नदीवर गेलेली एक महिला व दोन मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (दि. ११) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोघींना वाचविण्यात यश आले, तर राधा नागजी सावडा (वय १४) ही अल्पवयीन मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा मृतदेह आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास सारा ग्रिन सोसायटी जवळील नदीपात्रात सापडला. दरम्यान, या तिघींना वाचविण्यासाठी गेलेला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचा कर्मचारी किशोर गाडे याला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले.

मागील १५ वर्षांपासून म्हाडा कॉलनी परिसरात गुजरातमधील १० ते १२ पशुपालक कुटुंबीय वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी यातील हिरुबेन रघुन जाधव (५०), नीतू कालू जाधव ऊर्फ जोगराणा व राधा नागजीभाई सावडा (१४) या नातेवाईक असलेल्या तिघी ए.एस. क्लबच्या पाठीमागे देवगिरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या वेळी वाळूज परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नदीला अचानक पूर आला. पुराच्या पाण्यात हिरुबेन, नीतू व राधा या तिघी अडकल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, क्षणार्धात पुराचा जोर वाढल्याने या तिघी वाहून जाऊ लागल्या.

तेव्हा पुराच्या पाण्यात एका लाकडाचा आश्रय घेत हिरुबेन व नीतू या दोघी मदतीची याचना करीत होत्या. मात्र, पाणीपातळी वाढल्यामुळे नदीकडेवर नागरिक हताशपणे थांबले होते. दरम्यान, पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधा नागजी सावडा ही पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहा. निरीक्षक एम. आर. घुनावत, पोकॉ. किशोर गाडे यांच्यासह वाळूज व मनपाचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. हिरुबेन व नीतू जाधव या दोघींनी वाचविण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या पोकॉ. किशोर गाडे यांच्या हातातून दोर सुटल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. यावेळी मदतीसाठी आलेले नागरिक, पोलीस व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडे यांना वाचविले. यानंतर पुरात अडकलेल्या हिरुबेन जाधव व नीतू जाधव या दोघींनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

बेपत्ता राधाचा मृतदेह सापडला
या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राधाचा शोध घेण्यासाठी अग्निशमनचे जवान बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात सायंकाळी उशिरापर्यंत तिचा शोध घेत होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास सारा ग्रिन सोसायटी जवळील नदीपात्रात तिचा मृतदेह आढळून आला. राधा ही म्हाडा कॉलनी परिसरात आई कालबाई, वडील नागजीभाई व विक्रम व भरत हे दोन भाऊ यांच्यासह वास्तव्यास होती. या घटनेची माहिती मिळताच अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी अनिल कुलकर्णी, तलाठी दिलीप जाधव, तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, माजी सरपंच संजय जाधव, माजी जि. प. सदस्य रामचंद्र कसुरे, भरत सलामपुरे, आदींनी मदत केली. यावेळी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सावडा व जाधव कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांचे सांत्वन केले.

Web Title: Body of girl found who drowned in Devagiri river flood in Tisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.