जोगेश्वरीत विहिरीत वृद्धेचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 07:23 PM2018-12-24T19:23:05+5:302018-12-24T19:23:16+5:30
जोगेश्वरी येथे एका विहिरीत सोमवारी सकाळी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वृद्धेने आत्महत्या केली की तिचा कोणी खून केला याविषयी गूढ कायम आहे. भानुबाई भानुदास गुंजाळ असे मृत महिलेचे नाव आहे.
वाळूज महानगर : जोगेश्वरी येथे एका विहिरीत सोमवारी सकाळी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वृद्धेने आत्महत्या केली की तिचा कोणी खून केला याविषयी गूढ कायम आहे. भानुबाई भानुदास गुंजाळ असे मृत महिलेचे नाव आहे.
जोगेश्वरी शिवारीतील गटनंबर ४ मध्ये असलेल्या शेतात पंडित दुबिले व हरिभाऊ दुबिले यांची सामुहिक विहीर आहे. सोमवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास काही शाळकरी मुले बोरं आणण्यासाठी गेले होते. यातील काही मुलांना बोरीच्या झाडाजवळील विहिरीतील पाण्यात महिला तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही माहिती गावात येऊन ग्रामस्थांना सांगितली.
नागरिकांनी विहीरीवर पहाणी करत या घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस व अग्निशमन केंद्राला दिली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी संघराज दाभाडे व किरण जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान अग्निशमन जवानही घटनास्थळी पोहचले. विहीर ५० ते ६० फुट खोल असल्याने अग्निशमन जवानांनी राहुल मुळे, जनार्दन दुबिले, मारुती काजळे, ईश्वर वाघचौरे आदी नागरिकांच्या मदतीने लोखंडी पलंगाला चारी बाजूने दोरी बांधून महिलेला विहीरीच्या बाहेर काढले. भानुबाई भानुदास गुंजाळ (९०) असे महिलेचे नाव आहे. सदरील महिलेस शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृत्युचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र भानुबाई या आजारी पडत असल्याने त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रात्रीपासून होती बेपत्ता ..
मयत भानुबाई या धार्मिक प्रवृत्तीच्या असून, अनेक वर्षापासून त्या जोगेश्वरी येथे भाऊ पंडित दुबिले व हरिभाऊ दुबिले यांच्याकडे राहतात. रविवारी रात्री ९ वाजता जेवण करुन झोपण्यासाठी गेल्या. मात्र, सकाळी नातेवाईकांना त्या दिसून आल्या नाहीत. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. मात्र त्या कुठेच मिळून आल्या नाहीत. शाळकरी मुलांनी माहिती दिल्यानंतर शेतातील विहीरीची पाहणी केली. विहीरीतील पाण्यात भानुबाई यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.