‘त्या’ तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:03 AM2021-09-24T04:03:27+5:302021-09-24T04:03:27+5:30
दौलताबाद : परिसरातील टाकळीवाडीत (ता. गंगापूर) अठरा वर्षीय राधा कैलास जारवाल या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पुढे आले होते. ...
दौलताबाद : परिसरातील टाकळीवाडीत (ता. गंगापूर) अठरा वर्षीय राधा कैलास जारवाल या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पुढे आले होते. दरम्यान, तरुणीचा मृतदेह तिच्या वडिलांनी खड्डा खोदून स्वत:च्या शेतात पुरून टाकल्याने बुधवारी रात्री दौलताबाद पोलिसांनी कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर गुरुवारी (दि.२३) सकाळी टाकळीवाडी शिवारातून तिचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात पाठविला. या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे.
गंगापूरचे नायब तहसीलदार अविनाश अंकुश, तलाठी गणेश लोणे, विश्वनाथ नागुर्डे या पंचांसमक्ष राधाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजश्री आडे, डी.बी. तडवी, फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.
एखाद्या चित्रपटात घडावी अशी चित्तथरारक घटना दौलताबादपासून काही अंतरावर असलेल्या टाकळीवाडीत सोमवारी घडली. बुधवारी हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती. राधा जारवाल (१८) या तरुणीचे सोमवारी दुपारी आईशी भांडण काय होते. त्याच दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वडील कैलास जारवाल घरी आल्यावर त्यांच्याकडे आई मुलीबद्दल तक्रार करते आणि वडील रागात येवून तिला काठीने मारतात. त्याचा राग आल्याने राधा घरातून पळ काढत शेताच्या दिशेने धावते. अन् विहिरीत उडी मारते. दरम्यान, वडील कैलास जारवाल हे पाठीमागून धावत जातात. तिला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शेजारी असलेल्या भाऊ आणि मेहुण्याची मदत घेतली. त्याच रात्री तिचे वडील कोणाला काही न सांगता एकटेच खड्डा खोदून मुलीस पुरून टाकल्याचा प्रकार पुढे आला होता. दरम्यान, मंगळवारी या घटनेची कुणकूण नातेवाईक व गावकऱ्यांना लागली. पोलीस पाटील उदयसिंग जारवाल यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. अन् तेथून तपासाला सुरुवात झाली.
-----
खोदकामातून काय आले समोर
बुधवारी रात्री मृत राधाचे आई-वडील व कुटुंबातील अन्य सदस्यांना चौकशीसाठी दौलताबाद पोलीस ठाण्यात आणले गेले. तर गुरुवारी सकाळीच पोलिसांनी पंचांसह घटनास्थळ गाठले. खोदकाम केले तेव्हा सुमारे अडीच फुटांचा खड्डा खोदण्यात आला होता. सर्वात आधी खड्ड्यांत गोधडी टाकली होती. त्यावर शालमध्ये गुंडाळून राधाचा मृतदेह ठेवला होता. त्यानंतर माती टाकून त्यावर बोर झाडाच्या काटेरी फांद्या टाकल्या होत्या. त्यावर दगड माती टाकण्यात आलेली होती.
--------
फोटो : टाकळीवाडी शिवारात याच ठिकाणी तरुणी राधा जारवालचा मृतदेह पुरलेला होता. पोलिसांनी पंचांसमक्ष तिचा मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढला.
230921\aameer khan_img-20210923-wa0067_1.jpg
टाकळीवाडी शिवारात याच ठिकाणी तरूणी राधा जारवालचा मृतदेह पुरलेला होता. पोलीसांनी पंचासमक्ष तिचा मृतदेह गुरूवारी सकाळी बाहेर काढला.