औरंगाबादेत बोगस पटसंख्येद्वारे शाळांची बनवेगिरी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत झाले उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:05 PM2018-10-29T17:05:06+5:302018-10-29T17:11:05+5:30
गंभीर स्वरूपाच्या अनियमितता शाळाभेटीदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आल्या.
औरंगाबाद : बोगस विद्यार्थ्यांच्या आधारे वाढीव पटसंख्या दाखविणे, बोगस पटसंख्येच्या आधारे वाढीव शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल करणे, शाळेत न येणाऱ्या शिक्षकांना नियमित वेतन अदा करणे, आदी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता शाळाभेटीदरम्यानशिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आल्या.
शनिवारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी काही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. तेव्हा खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये हजेरी पटावर नमूद एकूण विद्यार्थी संख्येपेक्षा अनेक विद्यार्थी व शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, हजेरी पटावर एकूण १८२ विद्यार्थी आहेत. शनिवारी भेटीदरम्यान प्रत्यक्षात एकूण ५६ विद्यार्थीच उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. गैरहजर विद्यार्थ्यांबाबत शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी विचारणा केली असता एकाही शिक्षकाला त्यासंबंधी उत्तर देता आले नाही. सरलप्रणालीअंतर्गत शाळा व विद्यार्थ्यांना कोड नंबर देण्यात आलेले आहेत; परंतु नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक दिसून आला नाही. त्याामुळे अन्य शाळांतील विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांची काल्पनिक नावे हजेरीपटावर नोंदविण्यात आली असावीत, असा संशय शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे ३-४ शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव या शाळेने शिक्षण विभागात सादर केले आहेत. एक शिक्षिका स्वेच्छा निवृत्ती घेणार होती; परंतु तिला स्वेच्छा निवृत्तीपासून परावृत्त करून तिला घरी बसूनच वेतन अदा केले जाते. तब्बल वर्षभरापासून सदरील शिक्षिका शाळेतच आलेली नाही. यासंदर्भात एकेका शिक्षकाकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. त्यावेळी शिक्षक दडपणाखाली दिसून आले. काही वाच्यता करावी, तर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. सेवाज्येष्ठता डावलली जाते. पदोन्नती नाकारली जाते, अशी कैफियत शिक्षकांनी मांडल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दोषींविरुद्ध कारवाई करणार
यासंदर्भात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, हा अतिशय गंभीर प्रकार असून, बोगस पटसंख्येच्या आधारे शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या संस्था, मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. यासारखे प्रकार अनेक शाळांमध्ये असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला असून, अचानक भेटी देऊन शासनाच्या रकमेचा अपहार करणाऱ्या शाळांचा भांडाफोड करणार असल्याचे ते म्हणाले.