बोगस पदवी प्रकरण: महाविद्यालयाच्या झाडाझडतीनंतर तपास ‘एसीपीं’कडून ‘पीआय’कडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:12 IST2025-04-23T15:12:20+5:302025-04-23T15:12:37+5:30

अनेकांच्या पदव्या पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचा तपास अधिकारीच बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Bogus degree case: After college raid, investigation transferred from ACP to PI of Crime Branch | बोगस पदवी प्रकरण: महाविद्यालयाच्या झाडाझडतीनंतर तपास ‘एसीपीं’कडून ‘पीआय’कडे वर्ग

बोगस पदवी प्रकरण: महाविद्यालयाच्या झाडाझडतीनंतर तपास ‘एसीपीं’कडून ‘पीआय’कडे वर्ग

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बाेगस एम. फिल पदव्यांच्या आधारे पीएचडीला प्रवेश प्रकरणात सहायक पोलिस आयुक्तांच्या पथकाने खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात जाऊन झाडाझडती घेतली. त्याठिकाणी अनेकांच्या पदव्या पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचा तपास अधिकारीच बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सहायक पोलिस आयुक्तांकडून तपास काढून घेत गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे तपास देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

विद्यापीठ प्रशासनाने बाेगस एम. फिल पदवीच्या आधारे प्रवेश घेत फसवणूक केल्यामुळे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव, सहसचिवांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा सुरुवातीला तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव खटाणे यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रकरणात रॅकेटची शक्यता असल्यामुळे सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. त्यात एसीपी शिंदे यांच्या पथकाने सुरुवातीच्या दोन आरोपींसह इतर तिघांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करीत आरोपी बनवीत अटक केली आहे. अटक आरोपींमधील तीन जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पाेलिसांनी अनेकांचे जबाब नोंदविले आहेत. त्याशिवाय १२ ते १४ जण बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी करीत असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या पथकाने खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. त्यात अनेकांच्या पदव्या हाती लागल्या आहेत. या पदव्या जप्त केल्यानंतर काही वेळातच प्रकरणाचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. सहायक पोलिस आयुक्तांकडून तपास काढून घेत गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे तपास देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय दबावाची चर्चा
नागपूर येथील शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत असतानाच बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी देणारे रॅकेट उघडकीस येत असतानाच राजकीय दबावापोटी तपास अधिकारी बदलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे एपीआयकडून तपास काढून घेत एसीपींकडे सोपवला हाेता. आता एसीपींकडून तपास काढून घेत कनिष्ठ अधिकारी असलेल्या पीआयकडे देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Bogus degree case: After college raid, investigation transferred from ACP to PI of Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.