मालमत्ता नियमित करून देणाऱ्या बोगस संस्थेला नागरिकांनीच पिटाळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 08:33 PM2019-03-28T20:33:26+5:302019-03-28T20:35:39+5:30
‘लोकमत’ने दिली सर्वप्रथम बोगस संस्थेची बातमी
औरंगाबाद : सातारा- देवळाईतील मालमत्ता नियमित करून देण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने बुधवारी चक्क बाजार मांडला होता. या भागातील सजग नागरिकांनी बोगस संस्थेचा हा डाव हाणून पाडला. त्यामुळे या संस्थेला गाशा गुंडाळून काढता पाय घ्यावा लागला.
जटवाडा रोडवर या संस्थेने अनधिकृत बांधकामे नियमित करून देण्याचे नागरिकांना आश्वासन दिले. एका मालमत्ताधारकाकडून चक्कदहा हजार रुपये नोंदणी फी घेतली. नंतर मनपाचे कर्मचारी आल्यावर आणखी फी द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले. एक मालमता नियमित करण्यासाठी साधारण ४० हजार रुपये खर्च येईल, असेही बोगस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. यासंदर्भात ‘लोकमत’कडे असंख्य नागरिकांनी विचारणा केली. ‘लोकमत’ने पडताळणी केली असता मनपा प्रशासनाकडून अशी कोणतीही संस्था नेमण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले होते. २० मार्चच्या अंकात ‘लोकमत’ बोगस संस्थांपासून नागरिकांनी अलर्ट राहावे, असे सांगितले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सातारा-देवळाई भागात त्याच बोगस संस्थेने मालमत्ता नियमित करून देण्यासाठी शिबीर आयोजित केल्याची पत्रके वाटली. एका वाहनातून नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. रेणुका माता कमानीपासून आत जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी बोगस संस्थेने टेंट लावून आपले दुकान सुरू केले. याचवेळी या भागातील नागरिकांनी मनपाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्यापासून वाचवा, सदरील शिबीर सुरू केलेल्या संस्थेची त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी सतीश सांगुळे, सचिन कांबळे, सोमीनाथ शिराणे, रामेश्वर पेठारे, रणजित ढेपे, प्रदीप जाधव, रमेश बहुले, विजय कुठडे, समीर खेमणार, बाळू सांगुळे आदींची उपस्थिती होती.
महापालिका अधिकारी घटनास्थळावर दाखल होण्यापूर्वीच बोगस संस्थेने गाशा गुंडाळून पळ काढला. फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने संस्थेने टेन्ट टेम्पोमध्ये भरून पळ काढला.