सा.बां.कडून जखमेवर मीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:41 AM2017-09-25T00:41:53+5:302017-09-25T00:41:53+5:30
जालना रोडवर ठिकठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि निकृष्ट डांबराचा वापर करून खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर त्रस्त असताना रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उलट नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. जालना रोडवर ठिकठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि निकृष्ट डांबराचा वापर करून खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. हा सर्व प्रकार पाहून औरंगाबादकर क्षणभर थक्क झाले होते.
जालना रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरणाचे काम किती निकृष्ट करण्यात आले याची प्रचीती यंदाच्या पावसाळ्यात आली. क्रांतीचौक ते अमरप्रीतपर्यंत बारीक खडी आणि धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रोकडा हनुमान कॉलनीच्या कॉर्नरवर खड्डेच खड्डे पडले आहेत. आकाशवाणीच्या पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूने संपूर्ण सरफेसच उखडला आहे. चिकलठाण्यापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत. रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने जालना रोडची डागडुजी सुरू केली. खड्ड्यांमध्ये अत्यंत जाड आकाराची अगोदर खडी टाकण्यात आली. त्यावर निकृष्ट दर्जाच्या डांबराचे गोळे टाकण्यात येत होते. हे डांबराचे गोळे फोडण्यासाठी मजुरांना चक्क लोखंडी घनाचा आधार घ्यावा लागत होता. हा सर्व संतापदायक प्रकार पाहून अनेक नागरिकांनी, व्यापाºयांनी आश्चर्य व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे हे कोणते नवीन तंत्रज्ञान विकसित केले, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत होते. अशा चुकीच्या पद्धतीने खड्डे तर बुजणार नाहीत, उलट जाड खडीमुळे अपघातांचे प्रमाण निश्चित वाढणार आहे. खड्डे बुजविण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच सोडून तरी द्यावे असे नागरिकांनी नमूद केले.