बोगस कामांना अचानक आला वेग; मनपा अधिकारी, प्रकल्प सल्लागार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 02:11 PM2023-05-22T14:11:55+5:302023-05-22T14:12:06+5:30
आता दुभाजक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना कंत्राटदार खोदकाम न करताच दुभाजक उभारत असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : पंधराव्या वित्त आयोगाकडून महापालिकेला मिळालेल्या निधीतून शहरात १६ कोटी रुपयांचे दुभाजक उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी चार ते सहा इंच खोदकाम करून आतापर्यंत दुभाजक उभारण्यात आले. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची बदली होताच अंतिम टप्प्यात पोहोचलेली दुभाजकाची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, मनपा अधिकाऱ्यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
आठ वर्षांपूर्वी खड्ड्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली होती. शासन अनुदानातून जवळपास २७४ कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार केले. मात्र, दुभाजक उभारणीचा प्रश्न होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १५व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीतून १६ कोटींचे दुभाजक उभारण्याचा निर्णय घेतला. याचे डिझाइनसुद्धा अंतिम करण्यात आले. खासगी एजन्सीमार्फत काम सुरू केले. सिमेंट रस्ता असला तरी चार ते सहा इंच खोदकाम करूनच दुभाजक उभारण्यात आल्याचे चित्र नागरिकांनीही अनेक ठिकाणी पाहिले. विशेष बाब म्हणजे मागील काही महिन्यांपासून काम सुरळीत सुरू होते. आता दुभाजक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना कंत्राटदार खोदकाम न करताच दुभाजक उभारत असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडको एन-२ भागात हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे मान्य केले.
माती टाकताच पितळ उघडे
जकात नाका ते एमजीएम रोडवर महापालिकेच्या उद्यान विभागाने नवीन दुभाजकांत माती टाकली. त्यानंतर अवकाळी पाऊस आला. दुभाजकाचा शेवटचा भाग आपोआप गळून पडला. नंतर तो दुरूस्त करण्यात आला.
डिझाइनच तसे आहे
कार्यकारी अभियंता बी. डी. फड यांनी सांगितले की, खोदकामाचा प्रश्नच नाही. दुभाजकाचा एक भाग सिमेंट रस्त्यावर येतो. आतील भाग थोडासा खाली आहे. दुभाजकात मोठ्या प्रमाणात स्टीलचा वापर होतोय, त्यामुळे तो पडण्याची अजिबात शक्यता नाही.