रुग्णाच्या नातेवाईकाचे अपहरण करून उकळली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:04 AM2021-06-11T04:04:07+5:302021-06-11T04:04:07+5:30

औरंगाबाद : माझ्या वडिलांना तू मारहाण केली, असा आरोप करीत घाटीतून एका तरुणाचे अपहरण केल्यावर, त्याच्या नातेवाईकांना ...

Boiled ransom by kidnapping a relative of the patient | रुग्णाच्या नातेवाईकाचे अपहरण करून उकळली खंडणी

रुग्णाच्या नातेवाईकाचे अपहरण करून उकळली खंडणी

googlenewsNext

औरंगाबाद : माझ्या वडिलांना तू मारहाण केली, असा आरोप करीत घाटीतून एका तरुणाचे अपहरण केल्यावर, त्याच्या नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देत फोन पेवरून १० हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घाटी रुग्णालय परिसरात उघडकीस आला. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक करून अपहृत व्यक्तीची सुटका केली.

आरोपींमध्ये सिकंदर मुखीम पठाण (३५, रा. मिसारवाडी), ईश्वर विठ्ठल दिसागज (२९, रा . मिसारवाडी), मुकीम फकीरचंद पठाण (७०, रा. मिसारवाडी) व शाहरूख सिकंदर पठाण (१८, रा. धामणगाव, ता. फुलंब्री) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच कृष्णा रघुनाथ वाघ (रा. भोकरदन) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याविषयी सूत्रांनी सांगितले की, कृष्णा हे त्यांच्या आजारी मेहुण्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात घेऊन आले होते. त्यांच्या देखभालीसाठी कृष्णा आणि त्यांचा भाचा हे चार दिवसांपासून घाटीत आहेत. ९ जून रोजी रात्री ८ वाजता कृष्णा हे त्यांच्या मेहुण्यासाठी दूध आणण्यस कॅम्पसमधील हॉटेलवर गेले होते. तेव्हा तेथे अनोळखी व्यक्ती आली. त्याने कृष्णाला बोलण्यासाठी मोबाईल मागितला. विश्वास बसावा म्हणून अनोळखी व्यक्तीने त्याचा मोबाईल कृष्णा यांना दिला. त्यामुळे कृष्णा यांनी त्यांचा मोबाईल त्याला दिला. आरोपी त्यांच्या फोनवर बोलत बोलत काही अंतर गेला आणि पसार झाला. प्रतीक्षा करूनही तो परत आला नाही. शेवटी आरोपीच्या मोबाईलवरील शेवटच्या नंबरवर कॉल केला असता, समोरील व्यक्तीने, तो माझ्या वडिलांचा फोन असल्याचे सांगून ते घरी आले नाहीत, असे सांगितले. दरम्यान, गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एकाने त्यांना कॉल करून, तू टीव्ही सेंटर येथे येऊन फोन घेऊन जा, असे सांगितले. कृष्णा यांनी नकार दिल्यावर तीन अनोळखी व्यक्ती घाटीत आल्या आणि त्यांनी कृष्णा यांना कॉल करून बोलावले. यावेळी त्यातील एकाने माझ्या वडिलांना मारहाण झाल्याने त्यांना टीव्ही सेंटर येथील रुग्णालयात ॲडमिट केले आहे, असे म्हणून त्यांनी कृष्णाचे अपहरण केले. काही वेळाने त्यांनी कृष्णाचा भाचा यांना फोन करून २० हजार रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम न दिल्यास कृष्णाला मारून टाकू, अशी धमकी दिली.

चौकट

फोन पेवरून घेतली खंडणी

आरोपींनी एका दुकानदाराचा फोन पेचा क्रमांक कृष्णाच्या भाच्याला पाठवून, या फोन पेवर खंडणीची रक्कम पाठविण्यास सांगितले. यावेळी कृष्णाने नातेवाईकांना कॉल करून, आरोपींना खंडणीचे २० हजार रुपये द्या, ते मला मारहाण करीत असल्याचे सांगितल्याने, घाबरून नातेवाईकांनी तातडीने बेगमपुरा ठाण्यात धाव घेतली. पथकाने त्वरित कारवाई करून सापळा रचला. यावेळी आरोपींच्या खात्यात फोन पेवरून खंडणीचे दोन वेळा पाच हजार असे एकूण १० हजार रुपये पाठविले. यानंतर आरोपी कृष्णाला सोडण्यासाठी घाटीत येताच पोलिसांनी त्यांना पकडले.

चौकट

यांनी केली कारवाई...

पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, हवालदार देवा सूर्यवंशी, सय्यद शकील, शेख हैदर, संतोष चव्हाण, शरद नजन, सिटी चौक ठाण्याचे देशराज मोरे, अभिजित गायकवाड, संतोष संकपाळ, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे, नितीन देशमुख, धर्मराज गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या.

Web Title: Boiled ransom by kidnapping a relative of the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.