बोलबच्चन आरोपी राजेंद्र जैन याने पोलिसांनाही फिरवले महिनाभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 07:57 PM2019-07-08T19:57:28+5:302019-07-08T19:59:13+5:30
आईसाठी १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी दुकानात गेला अन्...
औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाच्या मदतीने ६५ किलो सोन्याचे दागिने पळविणाऱ्या राजेंद्र जैन याने आपल्याविरोधात गुन्हा दाखल करू नका, मी मोठ्या घरातील व्यक्ती आहे. पेठे यांचे सोन्याचे दागिने मी परत करतो. मला आठ-पंधरा दिवस मुदत द्या, अशी विनंती करणारे मेसेज पाठवून आणि वारंवार फोन करणाऱ्या बोलबच्चन राजेंद्र जैनने पोलिसांनाही तब्बल महिनाभर फिरवल्याचे समोर आले.
आईसाठी दहा गॅ्रमचे सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी २०१७ मध्ये राजेंद्र जैन हा समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये गेला. बोलबच्चन राजेंद्रने पहिल्याच भेटीत व्यवस्थापक अंकुर राणे याच्यासोबत ओळख करून घेतली. नंतर तो वर्षभर सतत दागिने खरेदीच्या निमित्ताने दुकानात जात होता. वर्षभरात त्याची आणि राणेची चांगलीच मैत्री झाली. कधी कधी तो उधारीवर सोन्याचे दागिने घेऊन जात असे आणि दोन ते चार दिवसांनंतर उधारीची रक्कम परत करी. उधारीवर सोने दिल्याच्या बदल्यात तो राणेला चारशे ते पाचशे रुपये कमिशन द्यायचा. असा राणेचा त्याने विश्वास संपादन केला. त्याने राणेकडून आॅक्टोबर २०१८ मध्ये पाच किलो सोने नेले. नंतर थोडे, थोडे करून आणखी पाच किलो दागिने तो घेऊन गेला. मार्च २०१९ पर्यंत त्याने ६५ किलो दागिने नेले. हे दागिने त्याने विक्री केले तर काही गहाण ठेवले. हा प्रकार दुकानमालक विश्वनाथ पेठे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी राजेंद्रला बोलावून दागिने परत करण्याचे सांगितले. तेव्हा त्याने आठ दिवसांत देतो, पंधरा दिवसांत आणून देतो, असे सांगून तो वेळ मारून नेत होता.
सीबीआयने पैसे जप्त केल्याचे पाठविले छायाचित्र
राजस्थानमधून जमीन विक्री करून येत असताना सीबीआयने आपली कार पकडली. या कारमध्ये कोट्यवधी रुपये होते, अशी थाप राजेंद्रने पेठे यांना मारली. हे पटविण्यासाठी पैसे जप्तीचे खोटे छायाचित्र त्यांना पाठविले. काही दिवस थांबा, आम्ही सुसंस्कृत कुटुंबातील लोक आहोत, पोलिसांत तक्रार करू नका, आमची बदनामी होईल, तुमचा माल परत करतो, अशा प्रकारची विनंती तो पेठे यांना करीत होता. तो सोने देण्याची तयारी दर्शवित असल्याने राणेप्रमाणे पेठे यांनीही त्याच्यावर तब्बल सहा महिने विश्वास ठेवला. पोलिसांनाही तो असे सांगत होता. शिवाय अनेक मेसेज पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी पाठविले. मात्र, तो बनवाबनवी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यास बेड्या ठोकल्या.