स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब

By मुजीब देवणीकर | Published: July 6, 2023 01:17 PM2023-07-06T13:17:57+5:302023-07-06T13:18:26+5:30

शहरात सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी जवळपास ३ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीने बोलार्ड खरेदी केले.

'Bollard' scam in Smart City! Purchase of about 3 crores; Now the file is missing | स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब

स्मार्ट सिटीत ‘बोलार्ड’ घोटाळा! सुमारे ३ कोटींची खरेदी; आता फाइलच गायब

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी चार वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीने सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून प्लास्टिकचे बोलार्ड खरेदी केले. नेमके बोलार्ड किती घेतले, कुठे वापरले आणि फाइल कुठे आहे याचे उत्तर स्मार्ट सिटी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नाही. त्यामुळे प्रशासक तथा सीईओ जी. श्रीकांतसुद्धा अवाक् झाले. प्रकरण बरेच अंगलट येत असल्याचे लक्षात येताच एका कर्मचाऱ्याने ३ हजार बोलार्ड शिल्लक असल्याचा खुलासा केला. तीन दिवसांत संपूर्ण माहिती न दिल्यास चौकशी सुरू करण्याचा इशारा प्रशासकांनी दिला.

स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरात सायकल ट्रॅकची संकल्पना राबविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. पहिला सायकल ट्रॅक क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रोडवर करण्यात आला, पण या भागातील व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे ‘ट्रॅक’ फसला. शहरात ट्रॅक तयार करण्यासाठी जवळपास ३ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीने बोलार्ड खरेदी केले. बोलार्डची खरेदी कधी केली, ते कुठे ठेवण्यात आले? कुठे वापरणार, याविषयी प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत होती. दरम्यान काही रस्त्यावर बोलार्ड वापरून सायकल ट्रॅक करण्यात आले. काही दिवसातच नागरिकांनी हे बोलार्ड तोडून टाकले, त्यात सायकल ट्रॅकचीदेखील वाट लागली. जी-२० परिषदेच्या काळात मोठ्या संख्येने बोलार्ड बाहेर आले. काही रस्त्यावर दुभाजक म्हणून तर काही रस्त्यावर लेफ्ट टर्न मोकळे करण्यासाठी बोलार्डचा वापर करण्यात आला.

अशी झाली चिरफाड
मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात जी. श्रीकांत यांनी बोलार्डचा विषय काढला. काही ठिकाणी बोलार्ड अर्धवट अवस्थेत मोडून पडले आहेत, ते बदलण्याची सूचना त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना केली. किती बोलार्ड शिल्लक आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर सारे गप्प बसले. खरेदीची फाइल कुठे आहे? किती कोटी रुपये खर्च करण्यात आले? कोणाच्या आदेशाने खरेदी करण्यात आली? अशी विचारणा त्यांनी केली. तीन हजार बोलार्ड शिल्लक असल्याचे अभियंता किरण आढे यांनी सांगितले; पण इतर प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत.

निविदा की थेट खरेदी?
बोलार्ड खरेदीसाठी स्मार्ट सिटीने निविदा प्रक्रिया राबविली का? की एखाद्या कंपनीकडून बोलार्ड थेट खरेदी करण्यात आले; याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Web Title: 'Bollard' scam in Smart City! Purchase of about 3 crores; Now the file is missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.