थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मराठवाड्यामध्ये ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चा कणा मोडला
By संतोष हिरेमठ | Published: May 8, 2024 01:46 PM2024-05-08T13:46:35+5:302024-05-08T13:47:34+5:30
जागतिक थॅलेसेमिया दिन विशेष: फक्त ब्लड कॅन्सरग्रस्तांचे होतात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्लड कॅन्सरग्रस्तांचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ होतात, मात्र, थॅलेसेमियाग्रस्तांचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ होत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे मराठवाड्यातील थॅलेसेमियाग्रस्तांना मुंबई, पुणे, बंगळुरु गाठावे लागत आहेत. शिवाय यासाठी शासनाकडून तोकडी मदत मिळत असल्याने लाखो रुपये जमा करण्यासाठी थॅलेसेमियाग्रस्तांच्या कुटुंबियांना मदतीसाठी याचना करण्याची वेळ येत आहे.
दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना १५ ते २५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने हा आजार होतो. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. त्याबरोबरच दोन ‘मायनर थॅलेसेमिया’ग्रस्तांनी विवाह केला तर जन्माला येणारे मूल ‘थॅलेसेमिया मेजर’ राहण्याची शक्यता असते.
जिल्ह्यात थॅलेसेमियाग्रस्तांची स्थिती
- २०१६ : ६८०
- २०२४ : १,२००
काय आहे हा आजार?
थॅलेसेमिया हा एक जनुकीय आजार आहे. थॅलेसेमियाग्रस्तांना दर १५-२० दिवसांच्या अंतराने रक्त द्यावे लागते. वारंवार रक्त घेतल्याने रक्तातील लोहाचे प्रमाण मर्यादेपलीकडे वाढते. त्यामुळे अतिरिक्त औषधांची गरज असते. लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबीनच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या जीन्समध्ये असामान्यता हे थॅलेसेमियाचे प्रमुख कारण आहे. आनुवंशिक दोष वारसाने येतो. जीन्समध्ये असलेल्या या असामान्यतेचे निम्मे प्रमाण दोन्ही पालकांमध्ये असल्यास (थॅलेसेमिया ट्रेट) यांच्या अपत्यामध्ये २५ टक्के हा आजार उद्भवतो, तर ५० टक्के अपत्ये कॅरिअर्स (निम्मे दोषवाहक) असतात.
मराठवाड्यात हवी ट्रान्सप्लांटची सुविधा
थॅलेसेमियाग्रस्तांच्या बोन बॅरो ट्रान्सप्लांटसाठी आजघडीला मुंबई, पुण्याला जावे लागते. त्यासाठी किमान १८ लाखांचा खर्च येतो. सरकारकडून पूर्वी ३ लाखांची मदत होत असे. आता ती दीड लाखांवर आली आहे. उर्वरित रक्कम पालकांना जमा करावी लागते. मराठवाड्यात सरकारी आणि खासगी रुग्णालय या दोन्ही ठिकाणी हे ट्रान्सप्लांट होत नाही. मराठवाड्यात ही सुविधा सुरू झाली पाहिजे.
- अनिल दिवेकर, सचिव, थॅलेसेमिया सोसायटी
पालकांनी घ्यावी काळजी
थॅलेसेमियाग्रस्त मुलांची पालकांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. वेळेवर रक्त दिले पाहिजे. दर तीन महिन्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. भाऊ-बहिणीचे बोन मॅरो मॅच झाल्यामुळे २५ टक्के थॅलेसेमियाग्रस्तांचे ट्रान्सप्लांट शक्य होते. जवळपास ७५ टक्के थॅलेसेमियाग्रस्तांना आयुष्यभर रक्त घेत राहावे लागते. शहरात ब्लॅड कॅन्सरच्या रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होतात. लवकरच इथेही थॅलेसेमियाग्रस्तांचेही ट्रान्सप्लांट होईल, अशी अपेक्षा आहे.
- डाॅ. मनोज तोष्णीवाल, रक्तविकार व बोन मॅरो ट्र्रान्सप्लांट तज्ज्ञ