ग्रंथप्रेमी शाम देशपांडे यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:47 AM2021-08-14T11:47:07+5:302021-08-14T11:47:28+5:30
मराठवाड्यातील साहित्य चळवळ, ग्रंथालय चळवळ, सांस्कृतिक चळवळ यांत श्याम देशपांडे यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.
औरंगाबाद : राजहंस प्रकाशनाचे औरंगाबाद प्रतिनिधी ग्रंथप्रेमी श्याम देशपांडे ( वय ७०)यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.
श्याम देशपांडे यांचे मुळ गांव पोहंडूळ (ता. पुसद,जि. यवतमाळ). शालेय शिक्षणानंतर पदवी साठी ते औरंगाबादला आले. स.भु. महाविद्यालयांतून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. आएमटीआर संस्थेत काही वर्षे त्यांनी नोकरी केली. त्यानंतर विद्या बुक्समध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर गेली २५ वर्षे राजहंस प्रकाशनाच्या मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून औरंगाबाद येथे ते कार्यरत होते.
मराठवाडा साहित्य परिषदेवर कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. अ.भा. मराठी साहित्य महामंडळावरही ते प्रतिनिधी म्हणून राहिले होते. बर्याच वृत्तपत्र, नियतकालीने, मासिके, साप्ताहिकांसाठी त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. अ.भा. साहित्य संमेलनांचे वार्तांकन सातत्याने केले.
मराठवाड्यातील साहित्य चळवळ, ग्रंथालय चळवळ, सांस्कृतिक चळवळ यांत श्याम देशपांडे यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. ''मराठी प्रकाशक परिषद अध्यक्षीय भाषणे''या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.