संत साहित्यिकांचा ‘ग्रंथ’ हेच अमूल्य ठेवा- लोमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:04 AM2017-11-15T00:04:00+5:302017-11-15T00:04:14+5:30
प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले. यावेळी टॉर्च ही कविताही लोमटे यांनी सादर केली. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
हिंगोली न. प. कल्याण मंडपम् येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी लोमटे बोलत होते. जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बघाटे, ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती. लोमटे म्हणाले, वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात कळतात. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. ज्या देशांनी संस्कृतींनी ग्रंथांचे, ज्ञानाचे महत्त्व ओळखले त्या देशांची भरभराट झाली. त्या देशांचा, त्या भागाचा विकास संतुलित पद्धतीने झाल्याचे आपणांस दिसून येते. ग्रंथ वाचनाने आपण सतत समृद्ध होत असतो. पुस्तकामुळे बाहेरील नवीन जगाची ओळख होते. या ग्रंथामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. वाचन ही एकच अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो.
प्रदर्शनाचे उद्घाटन- ग्रंथोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती.