उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठी सुधारण्यासाठी झटणारा पुस्तक विक्रेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:54 AM2019-06-13T11:54:18+5:302019-06-13T12:01:40+5:30

उर्दू माध्यमातील मुलांनाही उत्तम मराठी यावे यासाठी विशेष उपक्रमांची आखणी

Book shopper took efforts for improving the Marathi of Urdu medium students | उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठी सुधारण्यासाठी झटणारा पुस्तक विक्रेता

उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठी सुधारण्यासाठी झटणारा पुस्तक विक्रेता

googlenewsNext
ठळक मुद्देमिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी आखला ३ वर्षाचा कृती आराखडा उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेच्या विकासाचे प्रयत्न

औरंगाबाद : महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर इथल्या प्रत्येकाला मराठी बोलता, लिहिता, वाचता येणे गरजेचेच आहे. महाराष्ट्रात सर्व व्यवहार मराठीतून चालतात, शासन निर्णय मराठीत असतात, तसेच काही शासकीय नोकरीच्या बाबतीत मराठी उमेदवारांना मराठी येणे अनिवार्य असते. नोकऱ्या आणि व्यवहारज्ञान यामध्ये ती मागे पडतात. मात्र उर्दू माध्यमातील मुलांनाही उत्तम मराठी यावे यासाठी औरंगाबादमधील पुस्तक विक्रेते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी काही वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. 

ग्रामीण भागातील अमराठी मुले उत्तम मराठी बोलतात; पण शहरी भागात मात्र मुस्लिम विद्यार्थी उर्दू माध्यमात शिक्षण घेतात. येथे मुलांना आठवड्यातून केवळ दोन-तीन तास मराठी शिकविली जाते. त्यांचे शिक्षक, पालक, आसपासचे विद्यार्थी हिंदी किंवा उर्दू बोलणारे असतात. त्यामुळे मग या शहरी मुस्लिम मुलांना मराठी शिकविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. यासाठीच अब्दुल नकवी वर्षभर विविध उपक्रम राबवून मुलांमध्ये मराठी विषयाची गोडी लावण्याचा प्रयत्न मिर्झा करत आहेत. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांकडून मराठीतून पत्रे लिहून घेणे, दर्जेदार मराठी बालसाहित्य या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, मराठीतील अनेक पुस्तके विविध उर्दू शाळांमधून वाटप करणे आदी उपक्रम नदवी राबवीत आहेत. 

रिड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनतर्फे अब्दुल नदवी यांनी १२ जून रोजी प्राईम स्टार इंग्लिश हायस्कूल येथे उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास कसा करता येईल, याबाबत विशेष बैठक घेतली. यादरम्यान पुढील बाबी ठरविण्यात आल्या.-
- मुलांची मराठी भाषेतील गुणवत्ता वाढावी म्हणून ३ वर्षांचा कृती आराखडा तयार करणे. 
- प्रत्येक उर्दू शाळेत मराठी दिवस व मराठी पंधरवडा साजरा करणे.
- अल्पसंख्याक आयोगातर्फे मराठी फाऊंडेशन योजनेअंतर्गत इयत्ता ५ वीपासून पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक मराठी शिक्षक नेमणे.
- मराठी फाऊंडेशन अंतर्गत मराठी भाषेचा अभ्यासक्रम तयार करणे.
- उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मराठी शिक्षकांसाठी किमान ६ महिन्यांमध्ये एक कार्यशाळा आयोजित करणे.
- मराठी भाषा संवर्धन व विकासाची दिशा ठरविण्यासाठी दि. ६ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

कायदा करावा लागणे शरमेचे
आपल्याच राज्यात मराठी सक्तीची करण्याविषयी कायदा करावा लागणे आणि त्यासाठी एवढा लढा द्यावा लागणे ही शरमेची बाब आहे. आज अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे की तेथील विद्यार्थ्यांना ना धड मराठी येते, ना हिंदी, ना इंग्रजी. मराठी भाषा कायदा तर झालाच पाहिजे; पण सोबतच मराठीला तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जे अभ्यासक्रम फक्त इंग्रजीतून उपलब्ध आहेत ते मराठीत निर्माण केले पाहिजेत, जेणेकरून लोक मातृभाषेतच शिक्षण घेण्यास प्राधान्य देतील.

मिर्झा नदवी राबवीत असलेले उपक्रम
विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून मिर्झा नदवींमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम :
१. दिवाळीच्या आणि उन्हाळी सुटीत उर्दू भाषिकांसाठी खास ‘चला बोलूया मराठीत’ हा उपक्रम ते स्वत:च्या घरीच राबवितात. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाविषयी माहिती देतात.
२. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना महापुरुषांविषयीचे मराठी पुस्तक वाचायला देणे.
३. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मराठी पुस्तकांचे वाटप
४. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मराठी पत्रलेखन स्पर्धा घेतली होती. यामध्ये उर्दू माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि महापौरांना शुद्ध मराठीत २५ हजार पत्रे लिहिली. 

Web Title: Book shopper took efforts for improving the Marathi of Urdu medium students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.