मागविला मोबाईल, फ्लिपकार्टने पाठविला विटेचा तुकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 06:53 PM2018-10-15T18:53:27+5:302018-10-15T20:36:53+5:30
याप्रकरणी ग्राहकाने हर्सूल ठाण्यात फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्ट या कंपन्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद - फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग पोर्टलच्या संकेतस्थळावरून ९ हजार १३० रुपयांचे जमा करून मोबाईल मागविला, मात्र कंपनीने ग्राहकाला पाठविलेल्या मोबाईलच्या पार्सलमध्ये चक्क विटाचा तुकडाच निघाला. याप्रकरणी ग्राहकाने हर्सूल ठाण्यात फ्लीपकार्ट आणि इन्स्टाकार्ट या कंपन्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी सांगितले की, सुदर्शननगर, हडको एन-११ येथील गजानन भानुदास खरात यांनी ९ आॅक्टोबर रोजी फ्लीप कार्ट वरून ९ हजार १३४ रुपयांचा मोबाईल खरेदी केला होता. ही रक्कमही त्यांनी आॅनलाईन कंपनीच्या खात्यात जमा केली. त्यानंतर कंपनीने त्यांना रक्कम मिळाल्याचा आणि आॅर्डर नंबरचा मेसेज पाठविला. शिवाय खरात यांनी दिलेल्या त्यांच्या दुकानाच्या पत्त्यावर चार दिवसात मोबाईलचे पार्सल येईल असे सांगितले.
१४ आॅक्टोबर रोजी खरात हे मयुरपार्क येथील त्यांच्या दुकानात असताना ई-कार्ट या कुरिअर कंपनीचा कुरिअर बॉय मोहम्मद जकेरिया सय्यद अली हा फ्लीपकार्ट कंपनीने पाठविलेले मोबाईलचे पार्सल घेऊन आला. त्या पार्सलवरील बॉक्सवर मोबाईचा ईएमआयई क्रमांक, मोबाईल कंपनीचे नाव आणि आॅर्डर क्रमांक आदी नमूद होती. तक्रारदार यांना पार्सल दिल्यानंतर त्यांची स्वाक्षरी घेऊन कुरिअर बॉय तेथून निघून गेला. काहीवेळाने खरात यांनी बॉक्स उघडला असता आत पॅकींग केलेल्या कॅरिबॅगमध्ये मोबाईल ऐवजी चक्क विटेचा तुकडा असल्याचे दिसून आले.
हे पाहून खरात यांनी लगेच कुरिअर बॉयला फोन करून ही बाब सांगितली. तेव्हा त्याने आम्ही कुरिअर कंपनीचे कर्मचारी असून आमचे काम केवळ पार्सल डिलिव्हरी करणे एवढेच आहे. पार्सलमध्ये काय असते, हे आम्हाला माहिती नसते असे सांगितले. फ्लीपकार्ट आणि ई कार्ट या दोन्ही कंपन्यांनी आपली फसवणुक करून आणि विश्वासघात केल्याची तक्रार खरात यांनी आज दुपारी हर्सूल ठाण्यात नोंदविली. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे तपास करीत आहे.