बुकिंग होतेय फुल! रेल्वे, ट्रॅव्हल्सचे आरक्षण करा, नाही तर दिवाळीत गर्दीत प्रवासाची येईल वेळ
By संतोष हिरेमठ | Published: October 14, 2023 05:25 PM2023-10-14T17:25:20+5:302023-10-14T17:26:00+5:30
दिवाळीत ट्रॅव्हल्सची किमान १५ टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी अवघ्या महिनाभरावर आली असून, प्रकाशोत्सवाच्या या सणात गावी जाण्यासाठी अनेकांकडून रेल्वे, ट्रॅव्हल्सचे आरक्षण करणे सुरू झाले आहे. त्यामुळे दसरा ते दिवाळीदरम्यान रेल्वे, ट्रॅव्हल्सच्या आसनांची बुकिंग फुल्ल होत आहे.
नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त शहरात अनेकजण आले आहेत. दिवाळीसाठी हे सर्व जण गावी जातात. प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्यक्रम दिला जातो. ज्या मार्गावर रेल्वे नाही, त्यासाठी ट्रॅव्हल बसला प्राधान्य दिले जाते. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन केले तर गर्दीतून आणि वेटिंगवर प्रवासाची वेळ ओढवते. शिवाय प्रवाशांच्या खिशाला कात्रीही बसू शकते. महिनाभरावर दिवाळी आली असल्याने अनेक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करीत बुकिंगवर भर देणे सुरू केले आहे. ट्रॅव्हल्सच्या २० टक्के जागांची बुकिंग महिनाभरआधीच दसरा ते दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीदरम्यान शहरातील १५२ ट्रॅव्हल्समधील साडेचार हजार सीटपैकी २० टक्के जागांची बुकिंग झाली आहे.
दिवाळीत किमान १५ टक्के भाडेवाढ
दिवाळीत ट्रॅव्हल्सची किमान १५ टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. आजघडीला पुण्यासाठी ६०० रुपये तर मुंबईसाठी जवळपास १४०० रुपये तिकीट आहे. मात्र, ऐन दिवाळीत पुण्याचे तिकीट ८०० रुपये तर मुंबईचे १७०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातून धावतात ३०० ट्रॅव्हल्स
शहरातून नागपूर, मुंबई, यवतमाळ, चंद्रपूर, पुणे, अमरावती, अहमदाबाद, सूरत, हैदराबाद इ. शहरांसाठी दररोज जवळपास १५२ ट्रॅव्हल्स धावतात. छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या इतर शहरातील ट्रॅव्हल्सची संख्याही दीडशेच्या घरात आहे.
दिवाळीत एकेरी मार्गावरच गर्दी
दिवाळीत प्रवाशांची एकेरी मार्गावर गर्दी असते. परतीच्या प्रवासात प्रवासी नसतात. इंधन खर्च निघावा म्हणून काहीसे भाडे अधिक असते. वर्षातील ८ महिने आम्ही ५० टक्के भाड्यावरच सेवा देतो. ‘एसटी’च्या तुलनेत दीडपड भाडे घेता येते. त्यापेक्षा अधिक भाडे आकारलेच जात नाही.
- मोहन अमृतकर, बस ओनर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट वेल्फेअर असोसिएशन