विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके
By Admin | Published: May 21, 2016 12:04 AM2016-05-21T00:04:29+5:302016-05-21T00:13:25+5:30
औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.
औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्या दृष्टिकोनातून बालभारतीकडे औरंगाबाद विभागातील ६ जिल्हा परिषदा आणि २ महापालिकांनी १ कोटी २१ लाख ३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी केली होती. त्यापैकी मागील सात दिवसांमध्ये ४६ लाख ९४ हजार ४६३ पुस्तकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे.
राज्य मंडळासह अन्य मंडळांच्यादेखील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून (बुधवारपासून) सुरू होत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व अनुदानित तसेच जि. प. व मनपाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करणे गरजेचे आहे. त्यानुसार पुस्तक वाटपाचा मुहूर्त टळू नये म्हणून औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि जळगाव या ६ जिल्हा परिषदांकडून तसेच दोन महानगरपालिकांकडून बालभारतीकडे १ कोटी २१ लाख ३३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीने १३ मेपासून पुस्तक वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख १ हजार ९५५ पुस्तकांचे, तर महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना ८ लाख २६ हजार ८७८ पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेने मात्र, अद्याप पुस्तके उचलण्यास सुरुवात केलेली नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीसाठी सुधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्यादृष्टीने बालभारतीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी सुधारित अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचादेखील मागणीनुसार पुरवठा केला जात असल्याची माहिती बालभारतीचे भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांनी सांगितले. यंदा अकरावीच्या अभ्यासक्रमातील मराठीचे ‘युवक भारती’ हे एकच पुस्तक सुधारित असेल.